©️®️#डॉ._जयश्री_गढरी
#संत _ज्ञानेश्वरांचे _अभंग__ विराणी
28 एप्रिल 2021
आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली अशी संतपरंपरा आहे. संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास असे कित्येक थोर संत महाराष्ट्राच्या भूमीला लाभले.
'माझा मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेहि पैजासि जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन '
अशी मराठी भाषेची महती संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली.
अवघे वीस एकवीस वर्षांचे ज्ञानेश्वर ,
संस्कृतमधील गीता मराठीत कशी सांगणार? असा प्रश्न जनसमुदायाला पडला,
तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले की ,
माझी मराठी अमृतालाही पैजेवर जिंकेल.
आणि खरोखरीच गीतेच्या 18 अध्याय आणि सातशे श्लोकावर नऊ हजार ओव्यांची अमृतवाणी 'ज्ञानेश्वरी' संत ज्ञानेश्वरांनी मराठीत लिहीली.
गीतेचे ज्ञान सर्वसामान्य, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची तत्कालीन समाजाकडून पराकोटीची उपेक्षा झाली.
समाजाच्या अवहेलनेवर आपल्या ज्ञानाने, संयमाने ,मृदुतेने मात करून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात महान कार्य केले.
संत ज्ञानेश्वरांचे महात्म्य लिहीणे खरेतर माझ्या आवाक्यापलीकडचे आहे.
लहानपणी आपण संत ज्ञानेश्वरांनी,
योगी चांगदेवांना भेटण्यासाठी भिंत चालवली. ज्ञानदेवाने रेड्याच्या मुखातून वेद वदविले , ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताईने मांडे भाजले अशा सुरस गोष्टींनी अचंबित झालो .
संत ज्ञानेश्वर संतकवी होते.
त्यांचे अभंग , भावगीते अत्यंत रसाळ आहेत.
ज्ञानेश्वरांच्या सर्वच रचनेत माधुर्य आहे गोडवा आहे.
ज्ञानेश्वरांच्या भक्तीगीतांना, भावगीतरूपी विरहिणींना पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सुरेख पैलू पाडले आहेत. संत ज्ञानेश्वर या महाकवीच्या रचना साक्षात ईश्वरीय स्वरांच्या लता मंगेशकर यांनी सप्तसुरांत गाऊन ज्ञानदेवांचे ह्रदय , मनच आपल्याला उलगडून दाखविले आहे.जसे
मोगरा फूलला..
मोगरा फूलला
फुले वेचिता बहरू
कळियांशी आला //1//
इवलेसे रोप
लावियले द्वारी
त्याचा वेलु
गेला गगनावेरी //2//
मनाच्या गुंती
गुंफीयेला शेला
बापरखमादेवीवरे
विठ्ठले अर्पियेला //3//
'मोगरा' हा शब्द उच्चारताच शुभ्रता, कोमलता, सुगंध ,त्यागी वृत्ती या सर्वांची अनुभूती येते.
या गीतातील लता मंगेशकर यांचा स्वर अत्यंत कोमल आहे. मोग-याच्या फुलांची, ज्ञानेश्वरांच्या मनाची मृदुता या भावगीतात ओसंडून वाहते.
संत ज्ञानेश्वरांना देखिल मोग-याच्या फुलांचे आकर्षण वाटले. ते म्हणतात दारात मोग-याचे इवलेसे रोप लावले होते.त्या रोपाचा वेल आता थेट आकाशापर्यंत पोहोचला आहे.
या मोग-याला फुलांचा बहर आला आहे.
खाली सांडलेली फुले वेचीत नाही तोवर नवीन कळ्यांचा बहर मोग-याला येतो आहे आणि या मोग-यांच्या फुलांचा जणू पाऊसच पडला आहे.
फुले वेचून या मोग-यांच्या फुलांचा शेला गुंफला आहे आणि तो विठ्ठलरखुमाईला अर्पण केला आहे.
या भक्तीगीतातून ज्ञानेश्वरांना असे सांगायचे असावे की , भक्तीचे छोटेसे रोप लावले होते ते आता वाढून थेट आकाशापर्यंत गेले आहे ,
आणि ईश्वराच्या या भक्तीमुळेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. या आत्मज्ञानाचा प्रकाश आसमंतात व्यापून थेट गगनापर्य॔त पोहोचला आहे. या आत्मतत्त्वाच्या वेलीवर ज्ञानाची असंख्य फुले बहरली आहेत.
आणि एकाग्र चित्ताने मी या फुलांचा शेला विणून विठ्ठल रखुमाईला अर्पण केला आहे.
या भक्तीगीतातून संत ज्ञानेश्वरांच्या मनातील भाव तंतोतंत व्यक्त झाले आहेत.
चित्तवेधक असे हे संत ज्ञानेश्वरांचे भक्तीगीत आहे. या गीतातून या महाकवीच्या शब्दांचा आणि मोग-याचा परिमळ आपल्या मनाला सुगंधित करतो.
संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या किंवा विरहिणी हा काव्यात्मक साहित्यकृतीचा नितांतसुंदर प्रकार होय.या विराण्या म्हणजे विरही स्त्रीची आर्तता , व्याकुळता !
ज्ञानेश्वरमाऊलीच्या या विरहीणीच्या मनातील प्रेमभाव शेवटी पांडुरंगाच्या भेटीसाठी आहे.
या विराण्या विरही स्त्रीपुरत्याच मर्यादित न राहता संपूर्ण सृष्टीतील अनुभव देतात.
भावनांचा कल्लोळ या विराण्यातून व्यक्त होतो. उत्कट प्रेम आणि विरह या रचनांमध्ये आहे. ज्ञानेश्वरांची कल्पकता ,रसिकता या विराण्यात ओतप्रोत भरलेली आहे. या विराण्यांत ज्ञानेश्वरमाऊलींनी ,
विठ्ठलभेटीची पराकोटीची ओढ, उत्कटता , विरह अत्यंत रसाळ ,मधूर शब्दांत वर्णन केली आहे.
सौंदर्याच्या खाणीचच जणू!
या विराण्यांचा आशय ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कलात्मक संगीतातून आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजातून आपल्या ह्रदयाचा ठाव घेतात.
ज्ञानेश्वरांच्या मनाच्या सहसंवेदना या विराण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला गहिवर दाटून येतो.
असाच एक सांगितीक चमत्कार...
घणु वाजे घुणघुणा / वारा वाहे रूणझुणा /
भवतारकू हा कान्हा/ वेळी भेटला का//1//
चांदु वो चांदणे / चांपे वो चंदने/
देवकीनंदनेविण/ नावडे वो //2//
चंदनाची चोरी / माझे सर्व अंग पोळी/
कान्हो वनमाळी/ वेगीं भेटला का//3//
सुमनाची शेज/ सितळ वो निकी /
पोळे आगीसारखी/ वेगी विझवा का//4//
तुम्ही गाता सुस्वरे/ ऐकोनी द्यावी उत्तरे /
कोकीळे वर्जावे तुम्ही बाईयांनो//5//
दर्पणीं पाहता/ रूप न दिसे वो आपुलें
बापरखमादेवीवरे/ मज ऐसें केले//6//
ईश्वराला भेटण्याची तीव्र ओढ ज्ञानेश्वरांना लागली आहे. ईश्वराचा विरह आता त्यांना सहन होत.
या रचनेत संत ज्ञानेश्वरांची भावभक्ती, सौंदर्यदृष्टी, रसिकता ओसंडून वाहत आहे.
शब्दपब्रम्हच जणू!
आकाशातील मेघ कडकडाट करीत आहे.
वा-याची थंडगार झुळुक वाहते आहे . तापलेल्या धरतीला जशी पावसाची ओढ लागते तशीच सर्व जगाचे दुःख हरणकर्त्या कान्हाला भेटण्याची मला अतोनात ओढ लागली आहे.
त्या परमेश्वराची व माझी त्वरित भेट घडवून आणा.
संत ज्ञानेश्वरांनी या विराणीत निसर्गातील अनेक सुंदर , सुंदर उदाहरणे दिली आहेत .
चंद्र आणि चांदणे तसेच चाफ्याचे फुल व चंदन या परिमल देणा-या , शीतलता देणा-या गोष्टी नक्कीच आहेत.
या अतिशय सुंदर गोष्टीही
देवकीनंदनापुढे मला रिझवीत नाहीत.
मनाला आनंद देणारा सुगंधित चाफा व चंदनाची गोडीही मला वाटत नाही. मला ईश्वर भेटीची प्रचंड ओढ लागली आहे.
माझा देव मला लवकरात लवकर भेटवा असे ज्ञानदेव आर्जव करतात.
मला असे वाटते की
ज्ञानेश्वरांची रसिकता, सौंदर्य दृष्टी , निसर्गावरील प्रेम या विराणीतून व्यक्त होतेच पण त्यांची ईश्वरप्राप्तीची ध्येयासक्ती या सर्वांपेक्षा उदात्त आहे.आणि
त्यामुळेच या निसर्गातील उत्तमोत्तम रम्य गोष्टीतही त्यांचे मन रमत नाही.
चंदनाचा लेप ज्ञानेश्वरांना थंड वाटत नाही तसेच
शीतल अशा चंदनाच्या चोळीही त्यांना पोचते आणि दाह सहन होत नाही. . श्रीकृष्णाची.लवकरात लवकर भेट घडावी असे त्यांना वाटते.
खरे तर कोमल आणि सुगंधित अशा फुलांची शय्या किती शीतलता देणारी आहे सौम्य ,सुरेख आहे. पण ईश्वराच्या विरहाग्नीमुळे ती ज्ञानदेवांना विस्तवासारखी पोळत आहे.
येथे या महाकवीची कविकल्पना खरेच खूप चित्ताकर्षक वाटते. ज्ञानदेवांनी तळमळ , व्याकुळता अत्यंत प्रभावी शब्दात व्यक्त झाली आहे.
कोकीळेचे कूजन किती मधूर आहे. तसेच कोणी सुस्वरात गातही असेल . हे गायन कानांना तृप्त करणारे निश्चित आहे पण तरीही तुम्ही या गायनात न रमता माझे म्हणणे ऐका आणि माझी ईश्वराशी त्वरित भेट घडवून आणा.
शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की
मी आरशात पाहिले तर मला माझे रूप दिसलेच नाही मला आरशात भगवंताचेच रूप दिसले. अशाप्रकारे
पांडुरंगाच्या रूपाशी माझी एकरूपता झाली आहे. माझी अशी अवस्था त्या
विठ्ठलाने माझी केली आहे.
संत ज्ञानेश्वरांचे काव्यात्मक साहित्य उच्च प्रतीचे ,दर्जेदार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या विरहीणी संपूर्ण सृष्टीतील चैतन्याची उत्कट अनुभूती आपल्याला देतात.
ज्ञानदेवांच्या भावनांची तीव्रता तसेच निसर्गातील सौंदर्य यात प्रकट होते.
सृष्टीतील
बाह्य गोष्टीत सौंदर्य आहे , माधुर्य आहे मनाला आकर्षित करून आनंद देणा-या या गोष्टी निश्चितच आहेत. परंतु तरीही .
आत्मज्ञानी, अद्वैतवादी ज्ञानेश्वरांना शाश्वत आणि निरंतर अशा आनंदाचा प्रत्यय विठ्ठलरखुमाईच्या भेटीतच होतो.
संत ज्ञानेश्वरांच्या सर्वच भावभक्तीपर रचना , 'पसायदान' भावनांच्या आणि विचारांच्या उच्च आणि उदात्त पातळीवर पोहोचवते.
वयाच्या केवळ एकवीस वर्षांच्या आयुष्यात 'ज्ञानेश्वरी' रचणारे आणि सातशे वर्षांपूर्वी विश्वशांतीची प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर व त्यांचे साहित्य हा आपल्याला लाभलेला अत्यंत मौल्यवान ठेवा आहे.
©️डॉ._जयश्री_गढरी
28 एप्रिल 2021
No comments:
Post a Comment