Wednesday, January 4, 2023

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे 
आहे.......
2 जानेवारी 2023 
©️®️डॉ.जयश्री राऊत _ गढरी _मुंबई 
# सूर्य # ललित 

अतिउष्ण ,तप्त, दाहक तेजस्वी अग्निचा तू एक गोळा!
तू अनादि, अनंत!
पूर्वेच्या राऊळात अवतरून भूमीला  दर्शन  देणारा !
हर्ष, उत्साहाचा  स्त्रोत तू ! 
अवघी सृष्टी तुझ्या ॠणात! 
तुझ्या अस्तित्वाने  भरतो मकरंद फुलाफुलांत! 
तू चराचराला जागविणारा, 
प्रभातसमयी तुझी  चाहूल लागताच ,
 वसुंधरा  प्रसन्नतेचा  पल्लव लेवून बसते गीत गात ! 


पृथ्वीचा केंद्रबिंदू, जैवसृष्टीचा तारक, काळोखाचा संहारक तू !

तू तेजस्वी ,  तू कश्यपपूत्र, कण॔पिताही तू ! 
सूर्यमालेतील 
ग्रहांचे  तूच केंद्रस्थान!
तुझ्या  आगमनाने सुवर्णरंगांचा उत्सव सजतो ,
जणू प्रसन्नतेचा  कलश ओसंडून  वहातो. 
खग  क्षितिजाकडे  झेपावतात.
आसमंतात नवचैतन्याला  पूर येतो.
तू हिमालयाच्या आकाशाला भिडणा-या शिखरांवर चकाकतोस. ..,निझ॔रांच्या नद्यांच्या ,ओढ्यांच्या प्रवाहाबरोबर चकाकत वाहणारा सूय॔प्रकाश तुझा!  तू अखंड उर्जास्त्रोत, तू नित्यनेमी!
पज॔न्यकर्ता, जगताचा नियंता!
चराचराच्या अस्तित्वासाठी  स्वतः  आनंदाने , तेजाने जळणारा तू! 
निरंतर प्रवास तुझा  देतो मनाला चेतना !

सात घोड्यांच्या रथावर आरूढ तू! 
सहस्त्ररश्मी किरणांची नक्षी नभाच्या भाळी उमटविणारा तू!
सृष्टीचा  राजा तू ! विश्वाचा पालनकर्ता  तूच !

कोणार्कच्या सूर्यमंदिरी अधिष्ठीत तूच!
सूर्याघ्य॔ तुला अर्पितो, श्रावणमासी रविवारी  पूजा तुला अप॔ण करतो!

 जन्मलग्नकुंडलीतही तुझे स्थान !

अवकाशातील स्वयंप्रकाशी तू तारा.🌄
सूर्योदयी सोनेरी किरणे उधळणारा. असंख्य पक्ष्यांना आकाशात विहरण्याची चेतना देणारा , अगणित पुष्पकलिका उमलविणारा!

वनांत, उपवनांत, बागेत गवतावर पसरणारा प्रकाश तुझा! तांबूस  कोवळे सूर्यकिरण  गवताच्या  पात्यावर पसरवून  मोत्याचे  नक्षीकाम  करण्याचे  तुझे  अजब कसब !
दाहीदिशा  लखलख  उजळविणारा  तू ! निसर्गचक्राचे भान देणारा ! दातृत्व  तुझे  महान! 
 तू कवींची प्रेरणा !! पर्यटनस्थळी पर्यटकांचे  तू आकर्षण  ! समुद्राच्या लाटालाटांवर , उषःकाली, सायंकाळी सोनेरी रंगाचा वर्षाव करतोस!
सुप्रभाती अंगणात सहजच कोवळ्या सूर्यकिरणांचा सडा शिंपतोस!
घराच्या खिडकीतून नकळत प्रवेश करणारा  उत्साहदाता तूच!

.सर्व बागांमध्ये सकाळी अलगद नवचैतन्याचा वर्षाव करणारा!
प्रभाती गवतावरच्या दवबिंदुंतून हळुवार  किरणांनी  चकाकणारा!

शेतांची, पिकांची, फळबागांची तू संजीवनीच! तूच विश्वाचा  निर्माता  ,पालनकर्ता,
तुझी  संगत शाश्वत , तुझी कृपादृष्टी  अखंड!
हे तेजोमय भास्करा सर्व वनस्पती, प्राणिमात्रांना प्रखर तेज अर्पण करणारा  तू !  

कधी अवचित घरातील  कवडश्यांच्या प्रकाशझोतात दिसणारा!
सृष्टीचा तारणकर्ता तू!
आदित्य तू!भास्कर, रवि, हिरण्यगभ॔, अक॔, मित्रही तूच!

मेघांच्या कडांची  सोनेरी रेषा तुझ्याच सूर्यकिरणांची!
विहंगम इंद्रधनुष्य तुझेच प्रकाशरूप!

वनस्पतींच्या हरितद्रव्य आधारित जैवरासायनिक प्रक्रियेचा तूच कर्ता , 
म्हणूनच जिवीतांचा अन्नदाता, जीवनसत्व ' ड 'पूरक तूच! 
 तू सौरऊर्जेचे अखंडित उगमस्थान. सातत्याचा  मंत्र देणारा तूच ! 
तू तेजरूप! तू अग्निस्वरूप!!
 अंबर, धरेला तुझी चेतना 
ब्रम्हांडाशी  तुझी युती !
नतमस्तक  तुझ्यापुढे मी
अर्पण  तुला हे स्तवन!


ओम सूर्याय नमः

©️®️डॉ.जयश्री_ राऊत_गढरी_ मुंबई
02/01 / 2023

No comments:

Post a Comment

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......