#Motivational
#कीचन_टोमॅटो_टोमॅटो_कीचन
# ऑरगॅनिक_भाजीपाला
# kitchengarden
# organic_vegetables
©️डॉ._जयश्री_ गढरी
बियाणांच्या दुकानातून मी दोन वेळा टोमॅटोच्या बियांची पाकिटे आणली.
तीन वेळा कुंडीत रोपे तयार केली आणि गेल्या दोन वर्षांत चार वेळा रोपे लावली. या रोपांची वाढ तर चांगली झाली.
परंतु त्यांना टोमॅटो आलीच नाहीत.
एकदा पावसाळ्यात पासच्या मा-याने फुलेच झडली.
उन्हाळ्यात झाडाची पाने सुकली. गेल्या वर्षी तर हिवाळ्यात टोमॅटोचे झाड वाढले पाने सुकली नाहीत पण तरीही टोमॅटो आले नाहीत मन खूप हताश झाले.
पण मी आशेवर पाणी काही सोडले नाही.
चारपाच महिन्यांपूर्वी कीचनमध्ये भाजीसाठी टोमॅटो कापत होते. कापताना टोमॅटोच्या काही बिया नेहमीप्रमाणेच कीचनच्या ओट्यावर सांडल्या. त्या एका चमच्याने अलगद उचलून एका कुंडीत हळुच टाकल्या. आणि लक्षात आले की सातआठ दिवसांतच त्यांची छोटी छोटीरोपे तयार झाली.
त्यातल्या एका रोपाने चांगलेच बाळसे धरले होते. एके दिवशी त्याला हळुवार मुळांना धक्का न लागू देता बाजूची माती उकरून काढले.
आंघोळीच्या एका मध्यम आकाराच्या प्लॅस्टीकच्या बादलीला आपोआप चीर पडली होती. तिला खालून बुडाला पाच सहा छिद्रे पाडली. थोडी खालच्या बाजूने देखिल छिद्रं पाडली. त्यात वीटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, कोकीपीट, पूजेचे निर्माल्य, माती, पालापाचोळा ,गांडूळखत व मध्ये- मध्ये मातीचा थर देत भरले. त्या थोड्या जाडसर दांडीच्या आणि सातआठ कोवळी पाने फुटलेल्या रोपाचे त्यात रोपण केले. एक पान चुरगळून त्याचा सुगंध घ्यायची खूप इच्छा झाली . पण रोपाला इजा होईल म्हणून नाही घेतला सुगूध.टोमॅटोच्या चुरगळलेल्या पानांना खूप सुंदर सुवास येतो.
मी अधूनमधून भाज्यांची देठं , सुकलेली फुलं , संत्र्यांच्या साली चहा पिऊन गाळलेली चहापत्ती त्या रोपाला खाऊ म्हणून देत होते. कांदापाणी दर आठ दिवसांनी देत होते. केळीच्या सालीचे पाणी ही तीन वेळा दिले.
टोमॅटोचे झाड भराभर वाढत होते. पिवळीपिवळी, नाजुक नाजुक फुलेही आली झाडावर.
आणि...
एके दिवशी पिवळ्या फुलांमधूनच काहीतरी छोटेसे हिरव्या कळीसारखे डोकावल्याचा भास झाला.
पण मी दुर्लक्षच केले. छे!.छे !
मला भास झाला असावा.
चार दिवसांनी झाडाला पाणी घालताना लक्षात आले की अरे! हे तर टोमॅटोचे पिल्लू आहे. दिवसागणिक आकाराने वाढत आहे. एके दिवशी सकाळीच बाजूच्या फांदीवर दोन तीन हिरवीपोपटी टोमॅटोची पिल्लं बागडताना दिसली.
मला तर आनंदाने नाचावे असेच वाटायला लागले . ज्याची मी गेल्या दीड दोन वर्षांपासून प्रतिक्षा करीत होते ते टोमॅटो माझ्या खिडकीत वा-याबरोबर डोलत होते. मी पुन्हा झाडाला गांडूळखत घातले. कांदापाणी दिले.दरम्यान तीन पिटुकल्या टोमॅटोचा इवलासा गुच्छ आला होता. सर्व टोमॅटो अंगाने चांगलेच बारसे धरीत होते.
पण
'मन चिंती ते वैरी न चिंती '
या उक्तीप्रमाणे मला असे वाटायला लागले हे टोमॅटो लालच नाही झाले तर मी फोटो कसे काढणार लाललाल टॉमॅटोचे फोटो सुंदर दिसतील...
आणि अचानक एके दिवशी एका टोमॅटोवर हलकीशी लालसर छटा दिसली.आणि थोड्याच दिवसांत हिरव्या टोमॅटोचे संपूर्ण लाल रंगात रूपांतर झाले.
ह्या लाल रंगाच्या टोमॅटोला मात्र लगेच कॅमे-यात कैद केले. तीनचार टोमॅटो लालजर्दच झाले.
हिरवी पिल्लं फांदीवर बागडतच आहेत. हवेवर डोलत होती. टोमॅटोच्या कुटुंबाचा चांगलाच विस्तार होत आहे.
'सब्र का फल मीठा होता है'
या सुभाषिताची पक्की अनुभूती आली.
शिवाय मला काहीही खर्च न करता कीचनमधील भाजीसाठी कापलेल्या टोमॅटोच्या बीयांपासून पुन्हा किचनमध्ये भाजीसाठी तेसुद्धा रसायनविरहित टोमॅटो मिळाले. एक चक्र (सायकल) पूर्ण झाले. मला तर
'आनंदीआनंद गडे..
इकडे तिकडे चोहीकडे
आनंदीआनंद गडे
वरतीखाली मोद भरे
वायुसंगे मोद फिरे
नभात भरला
दिशांत फिरला
जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
आनंदी आनंद गडे
ही बालकवींची कविता
गुणगुणावीशी वाटली.
©️डॉ.जयश्री गढरी मुंबई
No comments:
Post a Comment