Wednesday, January 4, 2023

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे 
आहे.......
2 जानेवारी 2023 
©️®️डॉ.जयश्री राऊत _ गढरी _मुंबई 
# सूर्य # ललित 

अतिउष्ण ,तप्त, दाहक तेजस्वी अग्निचा तू एक गोळा!
तू अनादि, अनंत!
पूर्वेच्या राऊळात अवतरून भूमीला  दर्शन  देणारा !
हर्ष, उत्साहाचा  स्त्रोत तू ! 
अवघी सृष्टी तुझ्या ॠणात! 
तुझ्या अस्तित्वाने  भरतो मकरंद फुलाफुलांत! 
तू चराचराला जागविणारा, 
प्रभातसमयी तुझी  चाहूल लागताच ,
 वसुंधरा  प्रसन्नतेचा  पल्लव लेवून बसते गीत गात ! 


पृथ्वीचा केंद्रबिंदू, जैवसृष्टीचा तारक, काळोखाचा संहारक तू !

तू तेजस्वी ,  तू कश्यपपूत्र, कण॔पिताही तू ! 
सूर्यमालेतील 
ग्रहांचे  तूच केंद्रस्थान!
तुझ्या  आगमनाने सुवर्णरंगांचा उत्सव सजतो ,
जणू प्रसन्नतेचा  कलश ओसंडून  वहातो. 
खग  क्षितिजाकडे  झेपावतात.
आसमंतात नवचैतन्याला  पूर येतो.
तू हिमालयाच्या आकाशाला भिडणा-या शिखरांवर चकाकतोस. ..,निझ॔रांच्या नद्यांच्या ,ओढ्यांच्या प्रवाहाबरोबर चकाकत वाहणारा सूय॔प्रकाश तुझा!  तू अखंड उर्जास्त्रोत, तू नित्यनेमी!
पज॔न्यकर्ता, जगताचा नियंता!
चराचराच्या अस्तित्वासाठी  स्वतः  आनंदाने , तेजाने जळणारा तू! 
निरंतर प्रवास तुझा  देतो मनाला चेतना !

सात घोड्यांच्या रथावर आरूढ तू! 
सहस्त्ररश्मी किरणांची नक्षी नभाच्या भाळी उमटविणारा तू!
सृष्टीचा  राजा तू ! विश्वाचा पालनकर्ता  तूच !

कोणार्कच्या सूर्यमंदिरी अधिष्ठीत तूच!
सूर्याघ्य॔ तुला अर्पितो, श्रावणमासी रविवारी  पूजा तुला अप॔ण करतो!

 जन्मलग्नकुंडलीतही तुझे स्थान !

अवकाशातील स्वयंप्रकाशी तू तारा.🌄
सूर्योदयी सोनेरी किरणे उधळणारा. असंख्य पक्ष्यांना आकाशात विहरण्याची चेतना देणारा , अगणित पुष्पकलिका उमलविणारा!

वनांत, उपवनांत, बागेत गवतावर पसरणारा प्रकाश तुझा! तांबूस  कोवळे सूर्यकिरण  गवताच्या  पात्यावर पसरवून  मोत्याचे  नक्षीकाम  करण्याचे  तुझे  अजब कसब !
दाहीदिशा  लखलख  उजळविणारा  तू ! निसर्गचक्राचे भान देणारा ! दातृत्व  तुझे  महान! 
 तू कवींची प्रेरणा !! पर्यटनस्थळी पर्यटकांचे  तू आकर्षण  ! समुद्राच्या लाटालाटांवर , उषःकाली, सायंकाळी सोनेरी रंगाचा वर्षाव करतोस!
सुप्रभाती अंगणात सहजच कोवळ्या सूर्यकिरणांचा सडा शिंपतोस!
घराच्या खिडकीतून नकळत प्रवेश करणारा  उत्साहदाता तूच!

.सर्व बागांमध्ये सकाळी अलगद नवचैतन्याचा वर्षाव करणारा!
प्रभाती गवतावरच्या दवबिंदुंतून हळुवार  किरणांनी  चकाकणारा!

शेतांची, पिकांची, फळबागांची तू संजीवनीच! तूच विश्वाचा  निर्माता  ,पालनकर्ता,
तुझी  संगत शाश्वत , तुझी कृपादृष्टी  अखंड!
हे तेजोमय भास्करा सर्व वनस्पती, प्राणिमात्रांना प्रखर तेज अर्पण करणारा  तू !  

कधी अवचित घरातील  कवडश्यांच्या प्रकाशझोतात दिसणारा!
सृष्टीचा तारणकर्ता तू!
आदित्य तू!भास्कर, रवि, हिरण्यगभ॔, अक॔, मित्रही तूच!

मेघांच्या कडांची  सोनेरी रेषा तुझ्याच सूर्यकिरणांची!
विहंगम इंद्रधनुष्य तुझेच प्रकाशरूप!

वनस्पतींच्या हरितद्रव्य आधारित जैवरासायनिक प्रक्रियेचा तूच कर्ता , 
म्हणूनच जिवीतांचा अन्नदाता, जीवनसत्व ' ड 'पूरक तूच! 
 तू सौरऊर्जेचे अखंडित उगमस्थान. सातत्याचा  मंत्र देणारा तूच ! 
तू तेजरूप! तू अग्निस्वरूप!!
 अंबर, धरेला तुझी चेतना 
ब्रम्हांडाशी  तुझी युती !
नतमस्तक  तुझ्यापुढे मी
अर्पण  तुला हे स्तवन!


ओम सूर्याय नमः

©️®️डॉ.जयश्री_ राऊत_गढरी_ मुंबई
02/01 / 2023

Wednesday, November 10, 2021

दिवाळीचा_ किल्ला _ सांस्कृतिकसांस्कृतिक_ ठेवा

#दिवाळीचा- किल्ला--सांस्कृतिक ठेवा

©️®️#डॉ.जयश्री_ गढरी_ मुंबई
10 नोव्हेंबर 2021 


'मंगलदेशा,पवित्र देशा,दगडांच्या देशा,'असे ज्याचे वर्णन आहे त्या आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा म्हणजे 'दिवाळीचा किल्ला'!

ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,सुराज्य प्रस्थापित केले,त्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष म्हणजेच दिवाळीचा किल्ला होय !

बालगोपाळांचे भावविश्व समृद्ध करणारा,निर्मितीचा आनंद,सांघिक भावना,इतिहासाबद्दल ,आपल्या मातीबद्दल प्रेम ,आपुलकीची भावना दृढ करणारा !लहानपणी दिवाळीला मामांकडे खूप वेळा केला होता खूप मजा केली होती .हा  किल्ला एक अत्यंत जिव्हाळ्याचा! 

दिवाळी हा आपल्या सणांचा राजा आणि 'दिवाळीचा किल्ला' हे समृद्धीचे ,सुरक्षिततेचे प्रतिक!

यावर्षी आम्ही नवरात्रीपासूनच घरात किल्ला तयार करण्याची योजना आखली.फ्लॅटसंस्कृतीत किल्ला तयार करणे थोडेसे कठीण होते .आम्ही घरातील सदस्यांनी आणि सोसायटीतील काही मुलांनी मिळून किल्ल्याची योजना ठरविली.

फुलझाडांच्या नर्सरीत जाऊन दोन वेळा माती आणली.आमच्या घराच्या गॅलरीत एका कोप-यात जागा निश्चित केली.आम्ही बिल्डींग मटेरियलच्या दुकानात जाऊन वीसबावीस विटा खरेदी केल्या.त्या विटांनी किल्ल्याची सीमारेषा तयार केली.घराच्या मागच्या बाजूला मुंबई मेट्रोचे काम चालू आहे,तेथून मुलांनी सकाळी लवकर जाऊन छोटे छोटे दगड व खडी आणली.

काही विटा उभ्या तर काही आडव्या रचल्या.या विटांवर ज्यूटचे गोणपाट चढउतार होईल अशा रितीने अंथरले ,त्यावर नर्सरीतून आणलेली माती पसरली. पाण्याने ती माती गोणपाटावर लिंपली.काही प्रमाणात कोरडी मातीही या चढउतारावर पसरली.डोंगरासारखे दृश्य तयार झाले.मुलांनी पुठ्ठा आणून त्याला कापून काळ्या पांढ-या रंगांनी रंगवून बुरूज तयार केले.बुरूज करायला त्यांना खूप मजा आली.

मातीच्या डोंगरावर बुरूज बसवले.डोंगरावर,आम्ही सिंहगडावरून आणलेले मावळे उभे केले.सर्वात उंचावर  अर्थातच शिवाजीमहाराज !.त्यांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन केले.भगव्या रंगाच्या कागदाचा  हिंदुत्वाचा ध्वज तयार केला व शिवरायांजवळ दिमाखात रोवला! डोंगराच्या खालच्या बाजूला, एका पसरट प्लास्टीकच्या डब्याला  मातीत छोटा खड्डा करून सर्व बाजूंनी  मातीने  फिक्स केले  त्यात पाणी टाकले व छोटासा पाण्याचा तलाव तयार झाला.आता  मातीवर अळीव,गहू,मूग पेरले,आणि त्यावर रोज सकाळी संध्याकाळी पाणी शिंपडले.हळूहळू त्यातून  इवलेसे अंकुर यायला लागले.हिरवाई पसरायला लागली. जंगलासारखे दृष्य दिसायला लागले.त्यावर खेळणीतील प्राणी मांडले.  एक बैलगाडीही ठेवली .दिवसातून किमान तीन वेळा त्या हिरवळीचे निरीक्षण मुले करीत .अळीवाचे शेत खूपच सुरेख दिसत होते.या नवनिर्मितीचा मुलांना व आम्हांला खूप आनंद होत आहे आणि या किल्ल्याचे मुुलांना खूप अप्रूप वाटतेय! 

 महाराष्ट्रात शिवरायांनी  स्वाभिमान जागवला स्वराज्य  निर्माण केल्यावर या सुराज्याचे  शत्रू ,उन,वारा ,पाऊस या सर्वांपासून रक्षण करणारे सह्याद्रीतील हे गडकिल्ले! शिवरायांनी व मावळ्यांनी या गडकोटांवर अतोनात प्रेम केले . गडकिल्ले म्हणजे, सुरक्षितता ,स्वातंत्र्य,स्वधर्म,समृद्धी,सुराज्य यांचे प्रतिक!ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या एक अनमोल ठेव्याचा जनरेशन नेक्स्ट ला परिचय करून देण्याचा हा प्रयत्न !

'दिवाळीचा किल्ला हा ' अर्थातच आनंद ,उत्साह, ऊर्जा चैतन्य  वृद्धींगत करणारा एक  मौल्यवान ठेवा!

(आम्ही केलेल्या दिवाळीच्या किल्ल्याचे फोटो शेअर करीत आहे)
©️®️डॉ.जयश्री_ गढरी_.मुंबई

10नोव्हेंबर 2021

Thursday, October 7, 2021

नवरात्रोत्सव ( बीड डायरी)
©️®️डॉ._जयश्री  _राऊत_गढरी _मुंबई 
दि.8ऑक्टोबर 2021

लहानपणी नवरात्र सुरू झाले रे झाले की, खंडेश्वरीला जायची ओढ लागायची.
अगदी भल्या पहाटे उठून आई बंबात पाणी तापवायला ठेवायची. आम्ही सगळी बहिणभावंडे साखरझोपेतच असायचो. बंबात आंघोळीसाठी तापविलेले कढत पाणी अंगावर घेतले की झोप, आळस कोठल्याकोठे पळून जाई.
त्या काळात बीडला कंदील किंवा साठ वॅटचे बल्बच होते बहुतेक सर्वांकडे. रस्त्यावर मात्र नगरपालिकेचे मंद लाईट प्रकाशत असायचे.
सर्वांची तयारी झाली की पहाटे पाचच्या सुमारास आम्ही सर्वजण  कधीकधी शेजारीपाजारीही खंडेश्वरी
ला जायला निघायचो.

माळीवेस, दत्तमंदिर नंतर  नदीवरचा पूल ओलांडला की चमन लागायचे . चमनच्या समोर चमनच्या कुंपणाच्या आतील पांढऱ्याशुभ्र  मंद सुगंधी बुचाच्या फुलांचा  सडा पडलेला असायचा. 
.ती  फुले वेचायला आम्ही  लहानमुलेमुली पुढे धाव घ्यायचो.
मिळतील तेवढी ताजी बुचाची फुले खंडेश्वरीदेवीला वहायला गोळा करायचो.
अंधारातच जुने बीड लागायचे.
जुन्या बीडमधील घरांसमोर त्या घरातील मुली, स्त्रिया कंदील, टॉर्च घेऊन अंधारातच सुरेख रांगोळी रेखाटताना दिसायच्या. त्या रांगोळीत रंगही सुरेख 
भरायच्या .
स्त्रिया मुलांचे छोटे ,मोठे  अनेक गट खंडेश्वरीच्या दर्शनाला जाताना दिसायचे.
जुने बीड संपताच वस्ती नसलेला भाग ओलांडला की खंडेश्वरीची वाट लागायची. अंधार संपून प्रकाशाची चाहूल  लागायची म्हणजे  बीडच्या भाषेत उजाडायला लागायचे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी टेकडीवजा खडकांचे उंचवटे दिसायला लागले की खंडेश्वरीदेवी जवळ आली ही खूणगाठ मनात पक्की होई.
त्या खडकमातीच्या मिनी  टेकड्यांचा  थोडासा अरुंद रस्ता संपला की सुंदर  अशा निसर्गरम्य , विस्तीर्ण परिसरात प्रवेश व्हायचा.आणि.......
'मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला,
स्विकारावी पूजा आता उठी उठी गोपाला' या   स्वर्गीय आवाजातील भूप रागातील मधूर गाणे कानावर पडायचे. मनात, शरीरात एक चैतन्य ओसंडून वहायचे. सकाळी लवकर उठून लांबलांब  पायी चालत आल्याचा शीण या गाण्यातील सुरेल स्वरांनी कुठल्या कुठे पळून जायचा.

त्यावेळी असे वाटायचे, खंडेश्वरीच्या आजूबाजूचे डोंगरच 'मलयगिरी ' पर्वत असावेत आणि देवीला जागे करण्यासाठीच ही भूपाळी लावली असावी. खंडेश्वरीच्या संपूण॔ परिसरात कुमार गंधर्वांच्या सुरेल स्वरांनी प्रसन्नतेचा वर्षाव होत असे.

आजूबाजूला फुले विकणा-या स्त्रिया  त्यांच्याकडून फुले विकत घेतल्यावर दर्शन करून येईपर्यंत आनंदाने पादत्राणे सांभाळीत . झेंडूच्या फुलांचा तीव्र ,मंद सुवास संपूण॔ वातावरणात दरवळत असायचा.

बीडकर अतिउत्साही ! घरातून कितीही लवकर निघाले तरी देवीच्या बाहेरच्या दरवाज्यापर्यंत तरी रांग असेच. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक  दोन स्त्रिया कपाळाला मोठे कुंकू लावून हिरवी इरकल साडी आणि चोळी घालून  गळ्यात कवड्यांची माळ घालून परडीतही कवड्याची माळ घेऊन बसलेली असे. 'आई राजा उदो उदो ' असे म्हणत जोगवा मागीत असत.

स्त्रियांची आणि पुरूषांची अशी दर्शनाची स्वतंत्र रांग असे. स्त्री आणि पुरूषांच्या गाभा-यातील प्रवेशापूर्वी दोन सिंहाच्या प्रतिकृती होत्या. अगदी छोट्या दरवाज्यातून नतमस्तक होऊनच देवीच्या गाभा-यात प्रवेश करायला मिळायचा. आम्ही मुले चमनच्या  झाडांची आणलेली बुचाची फुले देवीला वाहत असू.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर डाव्या बाजूने बाहेर पडल्यावर मंदीराच्या आवारात लांबलचक ओसरी होती . तिथे पुष्कळ परडेकरी , जोगवेकरी बसलेले असत.
प्रदक्षिणा पूर्ण होण्यापूर्वीच उजवीकडे मंदीराबाहेर पडण्याचे दार होते. दर्शन झाल्यावर या दारातून बाहेर पडले की , कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचे 'ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ,
भेटीत तृष्टता मोठी ' हे सुमधूर गीत कानावर पडायचे.
या गीतातील हसणे, रुसणे, रुसणे ,हसणे कानात रुंजी घालायचे. परतताना कधी रेवड्या, फुटाणे , भाजलेले शेंगादाणे असा खाऊ मिळायचा.
क्वचितवेळा फुगे, पिपाणी,' पेंडूलम' सारखा रबराने खालीवर करण्याचा बॉल, कागदाच्या घडीची फोल्डींगची चित्रफित , दुर्बिणीसारखा सिनेमा अशा खेळणी मिळायच्या.
दुरूनच दीपमाळेचे दर्शन घेऊन आणि दोनच मिनीटे बसून लगेचच निघायचे. 
येताना जुन्या बीडमध्ये घरांच्या दारापुढे स्त्रियामुलींनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या स्वागत करीत असत. त्या रांगोळ्या थांबून पाहातच राहावे असे वाटे, पण घरी परतण्याची घाई असे.
पोटात भुकेने खड्डा पडायला लागे. आम्ही घरी पोहोचल्यावर चहापोळी खाऊन शाळेकडे धूम ठोकत असू.
स्त्रिया नवरात्रीचे उपवास करीत. या उपवासाचे अनेक प्रकार असत. पूर्ण नऊ दिवस उपवास,
फक्त चहा पिऊन म्हणजे कडक उपास,साबुदाण्याची खिचडी , भगर खाऊन,
एक वेळा जेवण करून,
उठता ,बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी अशा विविधप्रकारे  स्त्रिया  झेपेल  तसे नऊ दिवस उपवास करीत.

नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला पहिली माळ, दुसरी माळ असे म्हणत व घरातील घटावर प्रत्येक दिवशी पानाफुलांची माळा बांधीत.
नवरात्रीतील रविवारी खंडेश्वरीचा जाण्यासाठी  आमच्यासाठी लवकर उठण्याची अजिबात आवश्यकता नसे.
आरामात उठून खंडेश्वरीच्या सहलीची तयारी करायची.
धपाटे,वांग्याचे भरीत, शेंगदाण्याची चटणी , मिरचीचा ठेचा असा बेत असायचा.
तीनचार खाण्यांचा  ज्याला टिफीनचा डबा म्हणत तो भरला जायचा. नायलॉनच्या पिशवीत सर्व सामान व्यवस्थित भरून शेजारची मुलेमुली, काकी, काका मावशींसकट सहल निघायची खंडेश्वरीची! इतरही छोटी मुलेमुली कुटुंबियासमवेत सहलीला यायचे. रविवारच्या सहलीत घरी परतण्याची घाई नसायची. खंडेश्वरीच्या सगळ्या परिसरात फिरायचे .
खंडोबाच्या मंदीराच्या शांत परिसरात जाऊन दर्शन घ्यायचे.
दीपमाळेवर चढण्यासाठी उड्या मारायच्या आणि खूप प्रयत्न करून प्रथम दीपमाळेच्या ओट्यावर व नंतर दीपमाळेवर चढायचे आणि अहाहा.....बीडचा संपूण॔ नजारा पहायचा. छोट्याशा टेकडीवर अंगतपंगत सोबतच सहभोजन करायचे. पकडापकडीचा खेळ खेळायचा. दिवसभर .हुंदडून मग घरी निघायचे.

सप्तमीला आणि अष्टमीला देवीला कडाकण्यांचा फुलोरा वाहिला जायचा. हा फुलोरा प्रथम घरातील घटावर बांधला जायचा आणि खंडेश्वरी देवीपुढेही मंदीराच्या गाभा-यात बांधला जायचा.
निरनिराळ्या डिझाईनचा हा फुलोरा असे. यात छिद्रांच्या ,नक्षीकाम केलेल्या खुशखुशीत पु-या , देवीचा आरसा, वेणी, कंगवा ,कुंकवाचा करंडा असे प्रकार असत.
या कडाकण्यांची चव अप्रतिम असे.
कडाकण्या वर्षातून एकदाच होत व सर्व मुले यावर अक्षरशः ताव मारीत. कडाकण्या चहाबरोबरही खूप अप्रतिम लागत.
विजयादशमीला मात्र फक्त मुले आणि पुरूषमंडळीच खंडेश्वरीला सीमोल्लंघनाला जात.
समस्त पुरुषमंडळी मुले दस-याला आवर्जुन टेलरकडून नवीन कपडे शिवून घेत. दस-याला नवीन कपडे शिवायचेच हा नियमच बाबा आणि भावांसाठी  होता.पुरूष नवीन कपडे , डोक्यावर टोपी आणि टोपीत घरी उगवलेल्या घटातील धान्याच्या गवताचा तुरा खोवीत.
खंडेश्वरीहून सीमोल्लंघनाहून आलेल्या पुरूष मंडळींना, मुलांना स्त्रिया ओवाळीत असत. त्यानंतर 'सोन्याची 'म्हणजे आपट्यांच्या पाने एकमेकांना देत . छोटी छोटी मुले वडिलधा-यांना आपट्यांची पाने देऊन त्यांच्या पाया पडत. सर्वजण एकमेकांना भेटत. आपट्यांच्या पानांबरोबर प्रेमाची, आपुलकीची देवाणघेवाण होई. खंडेश्वरीचे आणि नवरात्रीचे असे अतूट नाते मनात खोलवर रूजले आहे.  (My repost with few changes)
 पोस्ट शेयर करणार असाल तर कृपया नावासकट करावी ही सर्वांना  विनंती .
©️®️डॉ_जयश्री _राऊत_गढरी__ मुंबई
8 ऑक्टोबर 2021

Saturday, August 14, 2021

8

#बीड डायरी.
#नागपंचमीच्या आठवणी.
12ऑगस्ट 2021
©️®️डॉ.जयश्री _राऊत_ गढरी_मुंबई
लहानपणी बीडला असताना, श्रावणाचे आगमन होण्यापूर्वीच नागपंचमीची चाहूल लागायची. नागपंचमीच्या निमीत्ताने स्त्रिया, मुली नवीन कपडे, साडी, लुगडे खरेदी करीत असत. नागपंचमीच्या दहापंधरा दिवस आधीच बलभीम चौकातील 'श्रीकृष्ण क्लाॅथ' या दुकानात नवीन कापड विकत घेतले जाई. श्रीकृष्ण क्लॉथचा दुकानदार   कांउंटरच्या मापानेच मीटरचे मोजमाप  घेऊन  नवीन कापड कात्रीने टर्रर्र ssआवाज करीत फाडत असे. 
नंतर  ते नवीन हलका सुगंध म्हणजे  नवीन कापडाचा वास नाकात भरून घेऊन  कापड टेलरकडे शिवायला टाकले जाई..
नागपंचमीच्या आधी स्त्रियांची शॉपींगची दुकानं म्हणजे धोडींपु-यातील 'लक्ष्मीनारायण ' किंवा ठक्कर बिल्डींगमधील पाय-या चढून वरती असणारे रस्त्यावरील दुकान.

या दुकानांतून 'गणपती छाप'लालभडक रंगणारी मेंदी, कानातले, गळ्यातली माळ, टिकल्या आणि नवीन फॅशन च्या बांगड्यांची खरेदी होत असे.
पंचमीच्या आधी आषाढी अमावस्येला दिवे, समया , देवाची भांडी चिंचेच्या कोळाने व खड्या मीठाने घासूनपुसून लख्ख होत व त्यांची पाटावर मांडून पूजा होई.  त्यावर आघाड्याची पाने आणि फुले वाहायची. श्रावणात आघाड्याला खूपच मान होता.  बीडला श्रावणाच्या आगमनाची तयारी अशी जोरात व्हायची.

श्रावण महिना सुरू होताच हिन्दुस्तान स्टोर्स मधून आणलेला 'जिवतीचा' फोटो घराघरात भिंतीला चिकटवला जायचा. तोच पुढच्या वर्षीही वापरायचा.काहीजण  तो फोटो लॅमिनेट  करून घेत.
नागपंचमीच्या एकदोन दिवस  आधीच बीडला  मेंदी लावण्याचा उत्सव रंगे 
एकदम उत्साहाचे वातावरण.!
 मेंदी जास्तीतजास्त गडद रंगावी यासाठी विविध प्रयोग होत. मेंदी उकळलेल्या चहापत्तीच्या पाण्यात भिजवणे, लोखंडाच्या तव्यावर भिजवणे, मेंदीत कात टाकणे.
जिची मेंदी अगदी डार्क चॉकलेटी,थोडी काळपट होईल ती  मुलगी नशीबवान असे. सगळ्या मुली तिची रंगलेली मेंदी बघत असत.नखांनाही नखपॉलिशच्या ऐवजी मेंदीच लावली जाई.

काही हौशी मुली ,स्त्रिया बीडमधील  मेंदीचे झाड  बहुतेक खासबागेकडे असावीत मेंदीची झाडे!शोधून त्या काटेरी झुडूपाची पाने खुडत. दगडाच्या पाट्यावर वरवंट्याने ती मेंदीचे पाने वाटीत. ही पानाची मेंदीही छानच रंगून येई.
नागपंचमीच्या आदल्या भावाचा उपास असे. त्याच दिवशी   रात्री मेंदी लावायचा कार्यक्रम असे. तळहातावर बोटानेच मध्यभागी मोठा टिपका काढायचा.त्याच्या आजूबाजूला कोप-यात मोठे टिपके काढायचे. काहीजणी आगपेटीची काडी मेंदीची डिझाईन काढण्यासाठी वापरीत . बोटांचा खालचा एकतृतीअंश भाग सोडून नखांसकट मेंदीचा जाड थर लावायचा. सगळ्यांच्या उजव्या हातावर अशाच प्रकारे मेंदी आई काढून देई किंवा  बहिण भावंडाकडून मेंदी काढून घेतली जाई.
नानागपंचमीच्या दिवशी सकाळीच अंधुक प्रकाशात जाग यायची. मेंदी किती रंगली याची खूपच उत्सुकता असे.
खोब-याचे तेल  अलगद हातावर चोळायचे. मेंदीचे इवलेइवले खपले निघायचे ..मेंदीचा गडद लाल रंग खुलायचा आणि मेंदीचा मंद मंद सुगंध दरवळायचा.
 साबण न लावता पाण्याने  हात धुवायचे.आणि एकमेकांची मेंदी किती रंगली ते पाहण्याचा कार्यक्रमच असे.

.नागपंचमीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे झोका!
सर्वांना झोक्याचे जणू वेडच लागे. झोक्याचे स्वप्न लहान मुलांना नागपंचमीच्या कितीतरी दिवस आधी पडायचे.
सोल (जाडसर असा मजबूत दोरखंड) शोधून ठेवला जायचा. घरातील छताच्या कड्यामध्ये सोल टाकून छोट्या मुलांसाठी घरातच झोका बांधला जायचा. 
बसल्यावर सोल टोचू नये म्हणून त्यावर जाड सोलापूरी चादर किंवा जाड सतरंजी टाकली जाई.
या झोक्यावर बसण्यासाठीही नंबर लागत. संख्या ठरवली  जायची पन्नास, शंभर झोके घ्यायचे. त्याप्रमाणे झोका खेळला जायचा.सोल हाताला खूप टोकायची,पण झोक्यावरून काही  उतरावे वाटत नसे.

ज्यांच्या अंगणात कडुलिंबाचे, पिंपळाचे झाड असे त्यांच्याकडे तर उंचच उंच झोका बांधला जायचा. दुहेरी सोलीच्या या झोक्यावर बसता यायचे आणि उभेही राहता यायचे.छोट्या मुलीला झोक्यावर बसवायचे स्वतः उभे राहून उंचच उंच झोका घ्यायचा. खूपखूप थ्रिल वाटायचे.खूप खूप मजा यायची!

दोन मुली झोक्यावर  एकमेकींकडे तोंड करून उभे राहात, एक मुलगी थोडी वाकुन झोक्याला उंच घेऊन जाई. तिच्या समोरची मुलगी ताकदीने तिच्यापेक्षाही उंचीवर झोका घेऊन जाई. खूप खूप उंच जाई झोका ! मज्जाच मज्जा येई.

कधी बीड शहरालगत  कोणाच्या शेतात बांधलेल्या उंच झोक्यावर बसण्याची संधी मिळे. त्या झोक्यावर उंचच उंच झोका घेतला की स्वर्ग फक्त दोन बोटे उरे.

 नागपंचमीला मुली, स्त्रिया नवीन कपडे, साड्या घालून नटून थटून एकमेकींना भेटत.  नागपंचमीच्या दिवसात बीडला ज्वारीच्या लाह्या करायची भट्टी लागे. बहुतेक जव्हेरी गल्लीत भट्टी होती. ज्वारी पाण्यात भिजवून रात्रभर सुती कापडात बांधून ठेवायची व दुस-या दिवशी भट्टीतून मोठाच डबा भरुन खमंग लाह्या करून आणायच्या. जिवतीच्या फोटोतील नागासमोर समोर दुध व लाह्या ठेवायच्या .
या लाह्यांना कधी फोडणी द्यायची तर कधी दह्याबरोबर खायच्या.

नवविवाहितेला सासरहून माहेरी आणण्याकरिता  मुलीचा सख्खाभाऊ चुलतभाऊ  किंवा मावसभाऊ पाठवून नागपंचमीला माहेरी बोलावले जाई.
माहेरी आलेल्या मुली,छोट्याछोट्या मुली नटूनथटून रात्री एकत्र जमत.फेर धरून गाणी म्हणत.
माहेरवाशीणी , झिम्मा, खेळत असत. घागर फुंकत. त्यांची फुगडी बघण्यात तर भान हरपून जात असे   त्यांचे खेळ खूप रंगात येत. त्यांचे खेळ संपूच नयेत असे वाटे.
( प्रिय मित्रमैत्रिणींनो ,
ही पोस्ट शेयर करू शकता पण माझ्या  नावासकट करावी.
यापूर्वी माझी  पोस्ट माझे नाव काढून या ग्रुपवर शेयर केली होती. म्हणून ही विनंती.
धन्यवाद 🙏)

©️®️डॉ.जयश्री_ राऊत_ गढरी_मुंबई
12ऑगस्ट 2021

(फोटो सौजन्य  गुगल )
.


Wednesday, May 26, 2021

Swatantraveer Sawarkar Jayanti , Sagara Pran Talmal la....Patriotic Song

©️#डॉ._जयश्री_गढरी.
   #28 _मे _2021
#स्वातंत्र्यवीर _सावरकर_जयंती 
#ने _मजसि_ ने_परत_मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला '

स्वातंत्र्यवीर सावरकरांची अजरामर गीतरचना.!
मातृभूमीवरील प्रेमाच्या अलौकिक काव्याला पं .ह्रदयनाथ मंगेशकरांनी राष्ट्रभक्तीच्याच संगीत सुरावटीत सजविले. मंगेशकर भावंडं आणि लताताईच्या दैवी,स्वर्गीय स्वरांनी हे  गीत चिरंतन राष्ट्रप्रेमीचे स्तोत्र झाले आहे.

भारतमातेवर इंग्रजांचे अधिराज्य होते आणि भारतमाता पारतंत्र्यात अडकली होती. लंडनमध्ये सावरकरांचे 'अभिनव भारत' या संस्थेचे क्रांतीकार्य चालू होते. सावरकर या क्रांतीकार्यात सक्रिय सहभागी होते.
सावरकरांच्या दोन्ही बंधूंना भारतात अटक झाली होती. सावरकरांना जर इंग्रजांनी लंडनमध्ये  पकडले तर ते त्यांना भारतात  परत पाठवणार नाहीत या विचारांनी ते अस्वस्थ झाले होते.
भारतात सावरकरांच्या कुटुंबाची वाताहत लागली होती. लंडनपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या  ब्रायटनच्या समुद्रकिनारी सावरकर बसले असताना प्रखर राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले हे गीत त्यांना स्फुरले.

मातृभूमीच्या विरहाच्या वेदनेतून निर्माण झालेले हे अद्वितीय काव्य या महापुरुषाचे मायभूमीवरील निस्सीम प्रेमाचे उदात्त दर्शन घडविते.
जगाच्या पाठीवर मायभूमीवरील तीव्र समर्पीत प्रेमाचे वर्णन अन्यत्र क्वचितच मिळेल.
या गीतात मातृभूमीवरील निर्व्याज, निस्वार्थ प्रेमाची आर्तता,उत्स्फूर्तपणे  व्यक्त झाली आहे.
आजच्या  काळात  लहान मुले, किशोरवयीन मुले यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करायचे असेल तर त्यांना हे प्रेरणागीत अगदी  लहानपणीच ऐकवायला हवे. 

सावरकर सागराशी  अत्यंत व्याकुळतेने संवाद साधत आहेत.
ते म्हणतात.,

भूमातेच्या चरणतुला तुज धुता मी नित्य पाहिला होता
मज वदलासि,
अन्य देशी चल जाऊ 
सृष्टीची विविधता पाहू.

माझ्या भारतमातेचे चरण धूत   असताना मी तुला  सतत पाहात होतो .एके दिवशी .तू मला म्हणालास,
 'विनायका चल आपण दुस-या देशात जाऊ .युरोपात जाऊ तेथील समृद्धी काय आहे ,संपन्नता  कशी आहे आणि सृष्टीचे वैविध्य  काय आहे हेपाहू .

तैं जननी ह्रद विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले.
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठी वाहीन त्वरित या परत आणीन.

माझ्या मातृभूमीचे मन  माझ्या विरहाच्या कल्पनेने अत्यंत व्यथित झाले.साशंक झाले तिला वाटले सागर आता माझ्या पुत्राला दूर सातासमुद्रापार  घेऊन जात आहे  तो परत  आणेल की नाही  अशी शंका भारतमातेला आली .पण सागरा,तू तिला शाश्वती दिलीस की, मी समुद्रातील योग्य  मार्ग दाखवेल आणि विनायकाला माझ्या पाठीवरून  घेऊन जाईन आणि लगेच  सुखरुपपणे परत इथे भारतात  आणून सोडेल तरी  तू व्यर्थ चिंता करू नकोस.
 
विश्वसलो या तववचनी मी 
जगद् नुभवयोगे बनुनी मी तवअधिक शक्त उद्धरणी मी.
येईन त्वरे कथुनि सोडले तिजला.
सागरा प्राण तळमळला ...तळमळला सागरा.
(येथे लताताईंचे आर्त स्वर थेट काळजाला भिडतात)
हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
सुंदर लय ,मृदू ,परिपक्व आवाज आणि मायभूमीच्या अनिवार ओढीने सागराचे केलेले आर्जव आपल्या रोमारोमात राष्ट्रप्रेम जागृत होते.

तुझ्या या माझ्या मायभूमीला दिलेल्या परत आणून सोडण्याच्या वचनावर मी विश्वास ठेवला. तू सर्वदूर पसरलेला आहेस. तसेच तुझ्यात उद्धरणशक्ती आहे.  सावरकर  विज्ञानवादी होते. या पाण्याच्या तरंगत ठेवण्याच्या गुणधर्माचा  त्यांनी  उल्लेख केला असावा असे वाटते. किंवा पाण्याच्या उद्धार करण्याच्या गुणधर्माविषयी लिहीले असावे. 

मी काम झाले की लगेचच परतून तुला भेटायला येईन असे माझ्या मातृभूमीला सांगून आलोय रे मी सागरा. 
म्हणून तू माझ्या मातृभूमीकडे लवकर लवकर घेऊन चल माझा प्राण तिच्यासाठी तळमळत आहे.
तू जगताचा उद्धारकर्ता आहेस सागरा...   मी माझ्या अतिप्रिय मातृभूमीला सोडून इथे दूर परदेशात आलो आहे.

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहू या पुढती?
दशदिशा तमोमय होती.....
 सावरकरांची अगतिकता येथे तीव्रतेने व्यक्त झाली आहे. आपण येथे लंडनला येऊन   जाळ्यात अडकलो आहोत अशी त्यांची भावना झाली. 
पोपट पिंज-यात किंवा  शिका-याच्या जाळ्यात  हरीण सापडावा तसा मी येथे अडकलो आहे. आता दाही दिशांत अंधारमय झाल्या आहेत.माझ्या मातृभूमीचा विरह. मी कसा आणि किती सहन करु?
तिचा विरह मला आता  असह्य होत आहे. सागरा तू लवकर मला तिच्याकडे घेऊन चल...

गुणसुमने मी वेचियले या भावे
की तिने सुगंधा घ्यावे 
जरी उद्धरणी व्यय न  
तिच्या हो साचा 
हा व्यर्थ भार विद्येचा.
(या कडव्यात सावरकरांचे मातृभूमीवरील नितांत प्रेम व समर्पण जाणवते.) ते म्हणतात.
मी गुणग्रहण आणि उच्च शिक्षण फक्त आणि फक्त माझ्य मातृभूमीच्या उद्धारासाठीच घेतले आहे. .जर माझ्या मातृभूमीच्या उद्धारासाठी ,तिची  पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी माझ्या गुणांचा, उच्च शिक्षणाचा  उपयोग होत नसेल तर या अशा शिक्षणाचा मला काहीच उपयोग नाही ते शिक्षण निव्वळ  व्यर्थ आहे.माझे शिक्षण माझे सर्वस्व फक्त माझ्या मायभूमीसाठीच आहे.केवढी अद्वैत भावना!
या उच्चकोटीच्या मानवतेसाठी सवरकरांना शतशः नमन करायला हवेत...

ती आम्रवृक्ष वत्सलता रे
नव कुसुमयुता त्या फुलता रे 
तो बालगुलाबही आता रे...
(या प्रगल्भ कवीचे क्रांतीकार्याच्या अस्थिर आयुष्यातही निसर्गाशी किती घनिष्ठ नाते होते हे दिसून येते.)
मला माझ्या मातृभूमीच्या डेरेदार आंब्यांच्या झाडांची अतिशय आठवण येते.
सुकोमल,नाजुक अशा वेलींचीस्मृती. माझ्या मनात आहे.तसेच माझ्या जन्मभूमीवरील  छोटासा पण सुगंधी, गुलाबी,गावठी गुलाब मला खूपखूप आवडतो. 
 इथल्या मोठमोठ्या  आकर्षक फुलांना तो माझ्या  मातीचा परिमळ मुळीच नाही.  मला येथील फुलेही माझ्या मातृभूमीच्या फुलांपुढे अगदी पैकी व गंधहीन वाटतात.
 माझ्या मातृभूमीचा रमणीय असा फुलबाग मला पारखा झाला आहे.  सागरा माझा प्राण तळमळत आहे.मला तू माझ्या मायदेशी घेऊन चल...

नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा,
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी 
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा
वनवास जरा तिच्या जरी वनीचा ,

इथे इंग्लंडमधील आकाशात किती सुंदर सुंदर तारका, नक्षत्रे आहेत परंतु मला माझ्या मायभूमीच्या  जमिनीप्रमाणेच आकाशाचीदेखील ओढ आहे. माझ्या मायभूमीचेच आकाश तारांगण तिच्याच वरच्या आकाशातील तारेच मला प्राण प्रिय आहेत.
तसेच येथे
लंडनमध्ये मोठमोठ्या इमारती, भव्य ,दिव्य राजवाडे  आहेत परंतु  मला माझ्या आईची छोटीशी साधीसुधी  झोपडीच  खूप आवडते.  मला राज्याची लालसा तर मुळीच नाही. माझ्या मातृभूमीच्या मातीवर माझे अतोनात प्रेम आहे.
आईच्या साडीचा पदर विटका ,फाटका असेल तरी   अस तिची कुशी जशी आपल्याला  अतिप्रिय असते तसाच मला माझ्या भारतमातेचा  वनवासही प्रिय आहे.
मला माझ्या देशासाठी तुरूंगात डांबले तरी चालेल , पण तो तुरूंगदेखिल  मला माझ्या  मायभूमीवरचाच हवा  अशी माझी इच्छा आहे.
(सावरकर मराठी,इंग्रजी,उर्दू या तिन्ही भाषेत निष्णात होते म्हणूनच त्यांच्या तोंडून सहजच तारा प्यारा,झोपडी प्यारी असे निघाले असावे.)
.
भुलविणे व्यर्थ हे आता रे
बहु जिवलग गमते चित्ता रे 
तुज सरित्पते जी सरिता रे 
तद् विरहाची शपथ घालितो तुजला,
सागरा प्राण तळमळला

सागरा,तू मला परत माझ्या मायदेशी घेऊन जाशील अशी थाप आता देऊन भुलवू नकोस. 
नदी कशी सागराला अनिवार ओढीने येऊन मिळते व समर्पित होते तशी मलाही माझ्या मातृभूमीची ओढ लागली आहे.
तू मला माझ्या मातृभूमीचा असह्य असा  विरह घडवशील तर तुझे ज्या सरितेवर प्रेम आहे त्या  सरितेचाही विरह तुला होईल,
समजा  नदी तुझ्याकडे आलीच नाही तर तडफडणे  ,तळमळणे म्हणजे काय असते ते तुला उमजेल .तळमळण्याची जाणीव होईल.
येथे सावरकरांची कवीकल्पना वाखाणण्याजोगे आहे.अशा व्यथित मनःस्थितीतदेखिल त्यांची  प्रतिभा तेजाने चमकत होती.

या फेनमिषे हससी निर्दया कैसा 
का वचन भंगिसी ऐसा
 त्व त्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते भिऊनी का आंग्लभूमीते.
मन्मातेला अबल म्हणूनि फसविशी,
मज विवासनता ते देश
आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझी ही माता रे.
कथिल हे अगस्तिस आता रे.
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला.

शेवटच्याा कडव्यात सावरकरांची आर्तता आता आक्रमकतेत,प्रचंड आत्मविश्वासात बदलली  .आणि या वीर जातीवंत सिंहाने सागराला पाहून डरकाळी फोडली...

नदीच्या विरहाची शपथ घातली तरीही  समुद्राच्या त  लाटा किना-यावर उफाळून येऊन आदळत होत्या. फेसाळत होत्या. समुद्र निर्दयीपणे आपल्या असहाय्यतेवर हासत आहे असे सवरकरांना वाटले. ते कडाडले.
तू  माझ्या मायभूमीकडे मला नेण्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करुन निर्दयीपणे हासत आहेस...
ते सागराला निर्वाणीचे सांगतात की,तू मला माझ्या मायभूमीकडे परत नेण्याचे वचन भंग करीत आहेस.
तुझ्यावर ज्या आंग्लभूमीचे राज्य आहे तिला तू भिऊन राहतोस आणि वरुन  माझ्या मातृभूमीला अबला म्हणून फसवित आहेस 
मला माझ्या मातेचा विजनवास देत आहेस . 
आता त्यांची व्याकुळता त्वेषात परावर्तीत होते. 
जाज्वल्य राष्ट्रभक्तीने ते तेजोमय होतात  आणि त्वेषाने  सागराला सांगतात की ,
इंग्रजी भूमीवर तू माझ्या मायभूमीला कितीही भय दाखविलेस तरी माझी मातृभूमी अबला नाही तर ती सबला आहे महाशक्तीशाली आहे आणि  याची प्रचिती तुला निश्चितच येईल सागरा...
माझी भारतामाता दुर्बल मुळीच नाही तर ती सामर्थ्यशाली  आहे. ती पारतंत्र्याची शृंखला  झुगारुन देऊन स्वतंत्र होणार आहे हे विधिलिखितच  आहे व तिचे सामर्थ्य किती महान आहे याची अनुभूती तुला येईलच हे पक्के ध्यानात ठेव सागरा...
आता जर तू माझे ऐकणार नसशील तर आमच्या अगस्ती ॠषीला तुझे गा-हाणे सांगावे लागेल ज्या महान अगस्तिने एका आचमनात रागाने तुला पिऊन टाकले होते त्याचे आम्ही वंशज आहोत.तुला आम्ही निश्चितच धडा शिकवू.
असा शेवटचा निर्वाणीचा इशारा सावरकर सागराला देत आहेत.

मातृभूमीवरील नितांत,उच्चकोटीच्या प्रेमाचे हे एकमेवाद्वितीय गीत आहे असे मला वाटते. मायभूमीवरील  उदात्त प्रेम या वीरपुरूषाच्या शरीराच्या पेशीपेशीतून ओसंडून वाहात होते. मंगेशकर बंधूभगिनींनी या अलौकिक काव्याला आपल्या मृदू ,कोमल,स्वरांनी व देशभक्तीच्या महान भावनेने  रत्नजडित केले आहे.
 इसवीसन 1909 मध्ये स्फुरलेले  गीत, शतकानंतरही आजही.
ताजे टवटवीत,कर्णमधुर वाटते. गीत ऐकताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात.राष्ट्रप्रेमाच्या लहरी मनात,शरीरात वाहतात.वातावरण पवित्र होते.

मातृभूमीच्या विरहाची ही व्याकुळता ,अगतिकता ऐकून 
राष्ट्राभिमान ,समर्पित देशभावना जाणवून आपण देशप्रेमाच्या पुलकित  भावनेने गहिवरून जातो.
सावरकरांच्या आणि आपल्या मातृभूमीच्या चरणी नतमस्तक होतो.
असे हे चिरंतन,महान प्रेरणादायी अद्वितीय गीत ऐकायलाच हवे.

सावरकरजयंतीच्या दिवशी वीरमहापुरुष वि.दा.सवरकरांना शतशः नमन.
©️डॉ._जयश्री_गढरी.मुंबई
28 मे 2021

Wednesday, April 28, 2021

#संत ज्ञानेश्वर अभंग

©️®️#डॉ._जयश्री_गढरी 
#संत _ज्ञानेश्वरांचे _अभंग__ विराणी
28 एप्रिल 2021 

आपल्या महाराष्ट्राची  गौरवशाली  अशी संतपरंपरा आहे. संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास असे कित्येक  थोर संत  महाराष्ट्राच्या भूमीला लाभले.

'माझा मराठीची  बोलू  कौतुके
 परि अमृतातेहि पैजासि  जिंके 
ऐसी अक्षरे  रसिके मेळवीन '

 अशी  मराठी  भाषेची महती संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली.
अवघे वीस एकवीस वर्षांचे ज्ञानेश्वर ,
संस्कृतमधील गीता मराठीत  कशी सांगणार?  असा प्रश्न जनसमुदायाला पडला,
 तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले की ,
माझी मराठी अमृतालाही पैजेवर जिंकेल. 
आणि खरोखरीच गीतेच्या 18 अध्याय आणि  सातशे श्लोकावर नऊ हजार ओव्यांची  अमृतवाणी  'ज्ञानेश्वरी' संत ज्ञानेश्वरांनी मराठीत  लिहीली. 
गीतेचे ज्ञान सर्वसामान्य, तळागाळातील लोकांपर्यंत  पोहोचवले. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या  भावंडांची  तत्कालीन  समाजाकडून  पराकोटीची उपेक्षा झाली.
 समाजाच्या अवहेलनेवर आपल्या ज्ञानाने, संयमाने ,मृदुतेने मात करून संत ज्ञानेश्वरांनी  आपल्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात  महान कार्य  केले.
संत ज्ञानेश्वरांचे महात्म्य लिहीणे खरेतर  माझ्या  आवाक्यापलीकडचे आहे.

 लहानपणी   आपण संत ज्ञानेश्वरांनी, 
 योगी  चांगदेवांना भेटण्यासाठी भिंत  चालवली. ज्ञानदेवाने  रेड्याच्या मुखातून वेद वदविले  , ज्ञानेश्वरांच्या  पाठीवर मुक्ताईने मांडे भाजले अशा सुरस गोष्टींनी  अचंबित  झालो .

संत ज्ञानेश्वर  संतकवी  होते.
त्यांचे  अभंग , भावगीते  अत्यंत  रसाळ आहेत.
ज्ञानेश्वरांच्या सर्वच रचनेत माधुर्य  आहे  गोडवा आहे.
ज्ञानेश्वरांच्या  भक्तीगीतांना, भावगीतरूपी विरहिणींना पंडीत  ह्रदयनाथ  मंगेशकर यांनी सुरेख पैलू पाडले आहेत. संत ज्ञानेश्वर या महाकवीच्या  रचना साक्षात  ईश्वरीय स्वरांच्या लता मंगेशकर यांनी सप्तसुरांत गाऊन   ज्ञानदेवांचे ह्रदय , मनच आपल्याला उलगडून दाखविले आहे.जसे 

मोगरा फूलला..
मोगरा फूलला
फुले वेचिता बहरू
 कळियांशी आला //1//

इवलेसे रोप 
लावियले द्वारी 
त्याचा वेलु 
 गेला गगनावेरी //2//

मनाच्या गुंती 
गुंफीयेला शेला 
बापरखमादेवीवरे 
विठ्ठले  अर्पियेला //3//

'मोगरा' हा शब्द उच्चारताच  शुभ्रता, कोमलता, सुगंध ,त्यागी वृत्ती  या सर्वांची  अनुभूती येते.
या गीतातील लता मंगेशकर  यांचा स्वर अत्यंत  कोमल आहे. मोग-याच्या फुलांची,  ज्ञानेश्वरांच्या  मनाची मृदुता  या भावगीतात  ओसंडून वाहते.
संत ज्ञानेश्वरांना  देखिल मोग-याच्या फुलांचे  आकर्षण वाटले.  ते म्हणतात दारात  मोग-याचे इवलेसे रोप लावले होते.त्या रोपाचा वेल आता  थेट आकाशापर्यंत  पोहोचला आहे.
 या मोग-याला फुलांचा बहर आला आहे.
खाली  सांडलेली फुले वेचीत नाही तोवर  नवीन कळ्यांचा बहर मोग-याला येतो  आहे आणि या मोग-यांच्या फुलांचा जणू पाऊसच पडला आहे.
फुले वेचून  या मोग-यांच्या  फुलांचा शेला गुंफला  आहे आणि तो विठ्ठलरखुमाईला  अर्पण  केला  आहे. 
या भक्तीगीतातून ज्ञानेश्वरांना  असे सांगायचे असावे  की , भक्तीचे छोटेसे रोप लावले होते ते आता वाढून थेट आकाशापर्यंत  गेले आहे , 
 आणि ईश्वराच्या  या भक्तीमुळेच आत्मज्ञानाची प्राप्ती  झाली आहे. या आत्मज्ञानाचा प्रकाश  आसमंतात व्यापून थेट गगनापर्य॔त  पोहोचला आहे.  या आत्मतत्त्वाच्या वेलीवर  ज्ञानाची असंख्य  फुले बहरली आहेत.
आणि एकाग्र  चित्ताने  मी या फुलांचा  शेला विणून विठ्ठल  रखुमाईला  अर्पण केला आहे.
या भक्तीगीतातून संत ज्ञानेश्वरांच्या मनातील  भाव तंतोतंत  व्यक्त  झाले आहेत.

चित्तवेधक  असे हे संत ज्ञानेश्वरांचे भक्तीगीत आहे. या गीतातून या महाकवीच्या शब्दांचा आणि मोग-याचा परिमळ आपल्या मनाला सुगंधित करतो.

संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या  किंवा विरहिणी  हा काव्यात्मक  साहित्यकृतीचा  नितांतसुंदर  प्रकार होय.या विराण्या म्हणजे विरही स्त्रीची आर्तता , व्याकुळता !

ज्ञानेश्वरमाऊलीच्या या विरहीणीच्या मनातील प्रेमभाव शेवटी पांडुरंगाच्या भेटीसाठी आहे.

या विराण्या  विरही स्त्रीपुरत्याच मर्यादित  न राहता संपूर्ण सृष्टीतील अनुभव देतात.
भावनांचा कल्लोळ या विराण्यातून व्यक्त होतो. उत्कट प्रेम आणि विरह या रचनांमध्ये आहे. ज्ञानेश्वरांची कल्पकता ,रसिकता या विराण्यात ओतप्रोत  भरलेली आहे. या विराण्यांत  ज्ञानेश्वरमाऊलींनी ,
विठ्ठलभेटीची पराकोटीची ओढ, उत्कटता , विरह अत्यंत रसाळ ,मधूर  शब्दांत वर्णन  केली आहे.
सौंदर्याच्या खाणीचच  जणू!
या विराण्यांचा  आशय ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कलात्मक संगीतातून आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या  स्वर्गीय  आवाजातून आपल्या ह्रदयाचा ठाव घेतात.
ज्ञानेश्वरांच्या मनाच्या सहसंवेदना या विराण्यातून आपल्यापर्यंत  पोहोचतात आणि  आपल्याला गहिवर दाटून येतो.
 असाच एक सांगितीक चमत्कार...

घणु वाजे घुणघुणा / वारा वाहे रूणझुणा /
भवतारकू हा कान्हा/ वेळी भेटला का//1// 

चांदु वो चांदणे / चांपे वो चंदने/ 
देवकीनंदनेविण/ नावडे वो //2//

चंदनाची चोरी / माझे सर्व अंग पोळी/
कान्हो वनमाळी/ वेगीं भेटला का//3//

सुमनाची शेज/ सितळ वो निकी /
पोळे आगीसारखी/ वेगी विझवा का//4//

तुम्ही गाता सुस्वरे/ ऐकोनी द्यावी उत्तरे /
कोकीळे  वर्जावे  तुम्ही बाईयांनो//5//

 दर्पणीं पाहता/ रूप न दिसे वो  आपुलें 
बापरखमादेवीवरे/ मज ऐसें केले//6//
ईश्वराला भेटण्याची  तीव्र  ओढ ज्ञानेश्वरांना  लागली आहे. ईश्वराचा विरह आता त्यांना सहन होत. 
या रचनेत संत ज्ञानेश्वरांची भावभक्ती, सौंदर्यदृष्टी, रसिकता ओसंडून  वाहत आहे.
शब्दपब्रम्हच जणू! 

आकाशातील मेघ कडकडाट करीत आहे.
वा-याची  थंडगार झुळुक वाहते आहे . तापलेल्या धरतीला जशी पावसाची ओढ लागते तशीच  सर्व जगाचे दुःख  हरणकर्त्या कान्हाला भेटण्याची मला अतोनात ओढ लागली आहे. 
त्या परमेश्वराची व माझी त्वरित  भेट घडवून आणा.
संत ज्ञानेश्वरांनी  या विराणीत  निसर्गातील अनेक सुंदर , सुंदर उदाहरणे दिली आहेत .
चंद्र आणि चांदणे तसेच  चाफ्याचे फुल व चंदन या परिमल देणा-या , शीतलता देणा-या गोष्टी नक्कीच  आहेत.
या अतिशय सुंदर गोष्टीही 
देवकीनंदनापुढे मला रिझवीत नाहीत. 
 मनाला आनंद देणारा सुगंधित चाफा व चंदनाची गोडीही मला वाटत नाही. मला ईश्वर भेटीची प्रचंड ओढ लागली आहे.
माझा देव मला लवकरात लवकर भेटवा असे ज्ञानदेव आर्जव करतात.

मला असे वाटते की
 ज्ञानेश्वरांची रसिकता, सौंदर्य दृष्टी , निसर्गावरील प्रेम या विराणीतून व्यक्त होतेच पण त्यांची ईश्वरप्राप्तीची ध्येयासक्ती या सर्वांपेक्षा उदात्त  आहे.आणि
त्यामुळेच  या निसर्गातील उत्तमोत्तम रम्य गोष्टीतही त्यांचे मन रमत नाही.
चंदनाचा लेप ज्ञानेश्वरांना थंड वाटत नाही तसेच 
शीतल अशा चंदनाच्या चोळीही त्यांना पोचते आणि  दाह सहन होत नाही.  . श्रीकृष्णाची.लवकरात लवकर भेट घडावी असे त्यांना वाटते.
 खरे तर कोमल आणि सुगंधित अशा फुलांची शय्या  किती शीतलता देणारी आहे सौम्य ,सुरेख आहे.  पण ईश्वराच्या विरहाग्नीमुळे ती ज्ञानदेवांना विस्तवासारखी  पोळत  आहे.
येथे  या महाकवीची कविकल्पना  खरेच खूप चित्ताकर्षक वाटते. ज्ञानदेवांनी तळमळ , व्याकुळता  अत्यंत प्रभावी शब्दात व्यक्त  झाली आहे.

कोकीळेचे कूजन किती मधूर आहे. तसेच कोणी सुस्वरात गातही असेल . हे गायन  कानांना तृप्त  करणारे निश्चित  आहे पण तरीही तुम्ही या गायनात  न रमता माझे म्हणणे ऐका आणि माझी ईश्वराशी त्वरित  भेट घडवून आणा.

शेवटी ज्ञानेश्वर माऊली  म्हणतात की 
मी आरशात पाहिले तर मला माझे रूप दिसलेच  नाही मला  आरशात भगवंताचेच रूप दिसले. अशाप्रकारे 
पांडुरंगाच्या रूपाशी माझी एकरूपता झाली आहे. माझी अशी अवस्था त्या 
विठ्ठलाने माझी केली आहे.
संत ज्ञानेश्वरांचे काव्यात्मक  साहित्य उच्च  प्रतीचे ,दर्जेदार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या विरहीणी संपूर्ण सृष्टीतील चैतन्याची उत्कट अनुभूती आपल्याला देतात.
ज्ञानदेवांच्या भावनांची  तीव्रता तसेच निसर्गातील सौंदर्य  यात प्रकट होते.
सृष्टीतील 
 बाह्य गोष्टीत सौंदर्य आहे , माधुर्य आहे मनाला आकर्षित करून आनंद देणा-या या गोष्टी निश्चितच  आहेत. परंतु तरीही .
आत्मज्ञानी, अद्वैतवादी ज्ञानेश्वरांना शाश्वत  आणि निरंतर  अशा आनंदाचा प्रत्यय विठ्ठलरखुमाईच्या भेटीतच होतो.

संत ज्ञानेश्वरांच्या सर्वच भावभक्तीपर रचना , 'पसायदान'  भावनांच्या आणि विचारांच्या उच्च  आणि  उदात्त  पातळीवर  पोहोचवते.
वयाच्या केवळ  एकवीस वर्षांच्या आयुष्यात  'ज्ञानेश्वरी' रचणारे आणि सातशे वर्षांपूर्वी विश्वशांतीची  प्रार्थना करणारे  संत  ज्ञानेश्वर व त्यांचे साहित्य हा आपल्याला  लाभलेला  अत्यंत  मौल्यवान  ठेवा आहे.
©️डॉ._जयश्री_गढरी 
28 एप्रिल  2021

Thursday, February 11, 2021

#कीचन_टोमॅटो# organic_vegetables #kitchengarden

#Motivational 
#कीचन_टोमॅटो_टोमॅटो_कीचन 
#  ऑरगॅनिक_भाजीपाला
# kitchengarden
# organic_vegetables
©️डॉ._जयश्री_ गढरी

बियाणांच्या दुकानातून  मी दोन वेळा टोमॅटोच्या  बियांची पाकिटे आणली.
तीन वेळा कुंडीत रोपे तयार केली आणि  गेल्या दोन वर्षांत चार वेळा रोपे लावली. या रोपांची वाढ  तर चांगली झाली.
परंतु  त्यांना  टोमॅटो आलीच नाहीत.
एकदा पावसाळ्यात  पासच्या मा-याने फुलेच झडली.
उन्हाळ्यात झाडाची  पाने सुकली. गेल्या वर्षी तर हिवाळ्यात  टोमॅटोचे झाड वाढले पाने सुकली नाहीत पण  तरीही टोमॅटो आले नाहीत मन खूप हताश झाले.
पण  मी आशेवर पाणी काही सोडले नाही.

चारपाच महिन्यांपूर्वी कीचनमध्ये भाजीसाठी टोमॅटो कापत होते. कापताना   टोमॅटोच्या काही बिया नेहमीप्रमाणेच कीचनच्या ओट्यावर सांडल्या.  त्या एका  चमच्याने अलगद उचलून एका कुंडीत  हळुच  टाकल्या. आणि लक्षात आले की  सातआठ दिवसांतच  त्यांची  छोटी छोटीरोपे तयार झाली. 

त्यातल्या  एका रोपाने चांगलेच बाळसे धरले होते. एके दिवशी त्याला हळुवार मुळांना धक्का  न लागू देता  बाजूची माती उकरून  काढले.
 आंघोळीच्या  एका मध्यम आकाराच्या प्लॅस्टीकच्या बादलीला आपोआप  चीर पडली होती.  तिला खालून बुडाला पाच सहा  छिद्रे  पाडली. थोडी खालच्या  बाजूने देखिल छिद्रं पाडली.  त्यात  वीटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, कोकीपीट, पूजेचे निर्माल्य, माती, पालापाचोळा ,गांडूळखत व  मध्ये- मध्ये मातीचा थर देत भरले.   त्या  थोड्या जाडसर दांडीच्या आणि सातआठ  कोवळी पाने फुटलेल्या  रोपाचे त्यात रोपण केले. एक पान चुरगळून त्याचा सुगंध घ्यायची खूप इच्छा झाली .  पण रोपाला इजा होईल म्हणून नाही घेतला सुगूध.टोमॅटोच्या  चुरगळलेल्या पानांना खूप सुंदर सुवास येतो. 

मी अधूनमधून भाज्यांची देठं , सुकलेली फुलं , संत्र्यांच्या साली चहा पिऊन गाळलेली  चहापत्ती  त्या रोपाला खाऊ म्हणून देत होते.   कांदापाणी दर  आठ दिवसांनी देत होते. केळीच्या सालीचे पाणी ही तीन वेळा दिले.

टोमॅटोचे झाड भराभर वाढत होते. पिवळीपिवळी, नाजुक  नाजुक फुलेही आली झाडावर.
आणि...
एके दिवशी  पिवळ्या  फुलांमधूनच  काहीतरी  छोटेसे हिरव्या कळीसारखे डोकावल्याचा भास झाला.

पण मी दुर्लक्षच  केले. छे!.छे !
मला भास झाला असावा.
 चार दिवसांनी झाडाला पाणी घालताना लक्षात आले की अरे! हे तर टोमॅटोचे  पिल्लू आहे. दिवसागणिक  आकाराने वाढत आहे. एके दिवशी सकाळीच बाजूच्या फांदीवर  दोन तीन हिरवीपोपटी टोमॅटोची पिल्लं बागडताना दिसली. 
मला तर आनंदाने  नाचावे असेच वाटायला लागले . ज्याची मी गेल्या दीड दोन वर्षांपासून प्रतिक्षा  करीत होते ते टोमॅटो माझ्या खिडकीत वा-याबरोबर  डोलत होते. मी पुन्हा झाडाला गांडूळखत  घातले.  कांदापाणी दिले.दरम्यान तीन पिटुकल्या टोमॅटोचा इवलासा गुच्छ आला होता.  सर्व  टोमॅटो   अंगाने चांगलेच बारसे धरीत होते. 
पण 
'मन चिंती ते वैरी न चिंती '
  या उक्तीप्रमाणे  मला असे वाटायला लागले हे टोमॅटो लालच  नाही झाले तर मी फोटो कसे काढणार लाललाल टॉमॅटोचे फोटो सुंदर दिसतील...
 आणि अचानक एके दिवशी एका टोमॅटोवर  हलकीशी  लालसर छटा दिसली.आणि थोड्याच दिवसांत  हिरव्या   टोमॅटोचे  संपूर्ण लाल रंगात रूपांतर  झाले.
 ह्या लाल रंगाच्या टोमॅटोला मात्र लगेच कॅमे-यात कैद केले. तीनचार टोमॅटो लालजर्दच  झाले.

 हिरवी  पिल्लं फांदीवर बागडतच आहेत. हवेवर डोलत होती. टोमॅटोच्या कुटुंबाचा चांगलाच विस्तार होत आहे.
'सब्र का फल मीठा  होता है'
या सुभाषिताची  पक्की अनुभूती आली.
 शिवाय मला काहीही खर्च  न करता कीचनमधील भाजीसाठी कापलेल्या टोमॅटोच्या  बीयांपासून पुन्हा  किचनमध्ये  भाजीसाठी तेसुद्धा रसायनविरहित  टोमॅटो मिळाले.  एक  चक्र (सायकल) पूर्ण  झाले. मला तर 
'आनंदीआनंद गडे..
इकडे तिकडे चोहीकडे 
आनंदीआनंद गडे 
वरतीखाली  मोद भरे 
वायुसंगे मोद फिरे
नभात भरला 
दिशांत फिरला
जगात उरला 
मोद विहरतो चोहीकडे 
आनंदी आनंद गडे
ही बालकवींची कविता 
गुणगुणावीशी  वाटली.

©️डॉ.जयश्री गढरी मुंबई 
  11फेब्रुवारी2021

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......