Wednesday, May 26, 2021

Swatantraveer Sawarkar Jayanti , Sagara Pran Talmal la....Patriotic Song

©️#डॉ._जयश्री_गढरी.
   #28 _मे _2021
#स्वातंत्र्यवीर _सावरकर_जयंती 
#ने _मजसि_ ने_परत_मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला '

स्वातंत्र्यवीर सावरकरांची अजरामर गीतरचना.!
मातृभूमीवरील प्रेमाच्या अलौकिक काव्याला पं .ह्रदयनाथ मंगेशकरांनी राष्ट्रभक्तीच्याच संगीत सुरावटीत सजविले. मंगेशकर भावंडं आणि लताताईच्या दैवी,स्वर्गीय स्वरांनी हे  गीत चिरंतन राष्ट्रप्रेमीचे स्तोत्र झाले आहे.

भारतमातेवर इंग्रजांचे अधिराज्य होते आणि भारतमाता पारतंत्र्यात अडकली होती. लंडनमध्ये सावरकरांचे 'अभिनव भारत' या संस्थेचे क्रांतीकार्य चालू होते. सावरकर या क्रांतीकार्यात सक्रिय सहभागी होते.
सावरकरांच्या दोन्ही बंधूंना भारतात अटक झाली होती. सावरकरांना जर इंग्रजांनी लंडनमध्ये  पकडले तर ते त्यांना भारतात  परत पाठवणार नाहीत या विचारांनी ते अस्वस्थ झाले होते.
भारतात सावरकरांच्या कुटुंबाची वाताहत लागली होती. लंडनपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या  ब्रायटनच्या समुद्रकिनारी सावरकर बसले असताना प्रखर राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले हे गीत त्यांना स्फुरले.

मातृभूमीच्या विरहाच्या वेदनेतून निर्माण झालेले हे अद्वितीय काव्य या महापुरुषाचे मायभूमीवरील निस्सीम प्रेमाचे उदात्त दर्शन घडविते.
जगाच्या पाठीवर मायभूमीवरील तीव्र समर्पीत प्रेमाचे वर्णन अन्यत्र क्वचितच मिळेल.
या गीतात मातृभूमीवरील निर्व्याज, निस्वार्थ प्रेमाची आर्तता,उत्स्फूर्तपणे  व्यक्त झाली आहे.
आजच्या  काळात  लहान मुले, किशोरवयीन मुले यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करायचे असेल तर त्यांना हे प्रेरणागीत अगदी  लहानपणीच ऐकवायला हवे. 

सावरकर सागराशी  अत्यंत व्याकुळतेने संवाद साधत आहेत.
ते म्हणतात.,

भूमातेच्या चरणतुला तुज धुता मी नित्य पाहिला होता
मज वदलासि,
अन्य देशी चल जाऊ 
सृष्टीची विविधता पाहू.

माझ्या भारतमातेचे चरण धूत   असताना मी तुला  सतत पाहात होतो .एके दिवशी .तू मला म्हणालास,
 'विनायका चल आपण दुस-या देशात जाऊ .युरोपात जाऊ तेथील समृद्धी काय आहे ,संपन्नता  कशी आहे आणि सृष्टीचे वैविध्य  काय आहे हेपाहू .

तैं जननी ह्रद विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले.
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठी वाहीन त्वरित या परत आणीन.

माझ्या मातृभूमीचे मन  माझ्या विरहाच्या कल्पनेने अत्यंत व्यथित झाले.साशंक झाले तिला वाटले सागर आता माझ्या पुत्राला दूर सातासमुद्रापार  घेऊन जात आहे  तो परत  आणेल की नाही  अशी शंका भारतमातेला आली .पण सागरा,तू तिला शाश्वती दिलीस की, मी समुद्रातील योग्य  मार्ग दाखवेल आणि विनायकाला माझ्या पाठीवरून  घेऊन जाईन आणि लगेच  सुखरुपपणे परत इथे भारतात  आणून सोडेल तरी  तू व्यर्थ चिंता करू नकोस.
 
विश्वसलो या तववचनी मी 
जगद् नुभवयोगे बनुनी मी तवअधिक शक्त उद्धरणी मी.
येईन त्वरे कथुनि सोडले तिजला.
सागरा प्राण तळमळला ...तळमळला सागरा.
(येथे लताताईंचे आर्त स्वर थेट काळजाला भिडतात)
हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
सुंदर लय ,मृदू ,परिपक्व आवाज आणि मायभूमीच्या अनिवार ओढीने सागराचे केलेले आर्जव आपल्या रोमारोमात राष्ट्रप्रेम जागृत होते.

तुझ्या या माझ्या मायभूमीला दिलेल्या परत आणून सोडण्याच्या वचनावर मी विश्वास ठेवला. तू सर्वदूर पसरलेला आहेस. तसेच तुझ्यात उद्धरणशक्ती आहे.  सावरकर  विज्ञानवादी होते. या पाण्याच्या तरंगत ठेवण्याच्या गुणधर्माचा  त्यांनी  उल्लेख केला असावा असे वाटते. किंवा पाण्याच्या उद्धार करण्याच्या गुणधर्माविषयी लिहीले असावे. 

मी काम झाले की लगेचच परतून तुला भेटायला येईन असे माझ्या मातृभूमीला सांगून आलोय रे मी सागरा. 
म्हणून तू माझ्या मातृभूमीकडे लवकर लवकर घेऊन चल माझा प्राण तिच्यासाठी तळमळत आहे.
तू जगताचा उद्धारकर्ता आहेस सागरा...   मी माझ्या अतिप्रिय मातृभूमीला सोडून इथे दूर परदेशात आलो आहे.

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहू या पुढती?
दशदिशा तमोमय होती.....
 सावरकरांची अगतिकता येथे तीव्रतेने व्यक्त झाली आहे. आपण येथे लंडनला येऊन   जाळ्यात अडकलो आहोत अशी त्यांची भावना झाली. 
पोपट पिंज-यात किंवा  शिका-याच्या जाळ्यात  हरीण सापडावा तसा मी येथे अडकलो आहे. आता दाही दिशांत अंधारमय झाल्या आहेत.माझ्या मातृभूमीचा विरह. मी कसा आणि किती सहन करु?
तिचा विरह मला आता  असह्य होत आहे. सागरा तू लवकर मला तिच्याकडे घेऊन चल...

गुणसुमने मी वेचियले या भावे
की तिने सुगंधा घ्यावे 
जरी उद्धरणी व्यय न  
तिच्या हो साचा 
हा व्यर्थ भार विद्येचा.
(या कडव्यात सावरकरांचे मातृभूमीवरील नितांत प्रेम व समर्पण जाणवते.) ते म्हणतात.
मी गुणग्रहण आणि उच्च शिक्षण फक्त आणि फक्त माझ्य मातृभूमीच्या उद्धारासाठीच घेतले आहे. .जर माझ्या मातृभूमीच्या उद्धारासाठी ,तिची  पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी माझ्या गुणांचा, उच्च शिक्षणाचा  उपयोग होत नसेल तर या अशा शिक्षणाचा मला काहीच उपयोग नाही ते शिक्षण निव्वळ  व्यर्थ आहे.माझे शिक्षण माझे सर्वस्व फक्त माझ्या मायभूमीसाठीच आहे.केवढी अद्वैत भावना!
या उच्चकोटीच्या मानवतेसाठी सवरकरांना शतशः नमन करायला हवेत...

ती आम्रवृक्ष वत्सलता रे
नव कुसुमयुता त्या फुलता रे 
तो बालगुलाबही आता रे...
(या प्रगल्भ कवीचे क्रांतीकार्याच्या अस्थिर आयुष्यातही निसर्गाशी किती घनिष्ठ नाते होते हे दिसून येते.)
मला माझ्या मातृभूमीच्या डेरेदार आंब्यांच्या झाडांची अतिशय आठवण येते.
सुकोमल,नाजुक अशा वेलींचीस्मृती. माझ्या मनात आहे.तसेच माझ्या जन्मभूमीवरील  छोटासा पण सुगंधी, गुलाबी,गावठी गुलाब मला खूपखूप आवडतो. 
 इथल्या मोठमोठ्या  आकर्षक फुलांना तो माझ्या  मातीचा परिमळ मुळीच नाही.  मला येथील फुलेही माझ्या मातृभूमीच्या फुलांपुढे अगदी पैकी व गंधहीन वाटतात.
 माझ्या मातृभूमीचा रमणीय असा फुलबाग मला पारखा झाला आहे.  सागरा माझा प्राण तळमळत आहे.मला तू माझ्या मायदेशी घेऊन चल...

नभी नक्षत्रे बहुत एक परि प्यारा,
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी 
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा
वनवास जरा तिच्या जरी वनीचा ,

इथे इंग्लंडमधील आकाशात किती सुंदर सुंदर तारका, नक्षत्रे आहेत परंतु मला माझ्या मायभूमीच्या  जमिनीप्रमाणेच आकाशाचीदेखील ओढ आहे. माझ्या मायभूमीचेच आकाश तारांगण तिच्याच वरच्या आकाशातील तारेच मला प्राण प्रिय आहेत.
तसेच येथे
लंडनमध्ये मोठमोठ्या इमारती, भव्य ,दिव्य राजवाडे  आहेत परंतु  मला माझ्या आईची छोटीशी साधीसुधी  झोपडीच  खूप आवडते.  मला राज्याची लालसा तर मुळीच नाही. माझ्या मातृभूमीच्या मातीवर माझे अतोनात प्रेम आहे.
आईच्या साडीचा पदर विटका ,फाटका असेल तरी   अस तिची कुशी जशी आपल्याला  अतिप्रिय असते तसाच मला माझ्या भारतमातेचा  वनवासही प्रिय आहे.
मला माझ्या देशासाठी तुरूंगात डांबले तरी चालेल , पण तो तुरूंगदेखिल  मला माझ्या  मायभूमीवरचाच हवा  अशी माझी इच्छा आहे.
(सावरकर मराठी,इंग्रजी,उर्दू या तिन्ही भाषेत निष्णात होते म्हणूनच त्यांच्या तोंडून सहजच तारा प्यारा,झोपडी प्यारी असे निघाले असावे.)
.
भुलविणे व्यर्थ हे आता रे
बहु जिवलग गमते चित्ता रे 
तुज सरित्पते जी सरिता रे 
तद् विरहाची शपथ घालितो तुजला,
सागरा प्राण तळमळला

सागरा,तू मला परत माझ्या मायदेशी घेऊन जाशील अशी थाप आता देऊन भुलवू नकोस. 
नदी कशी सागराला अनिवार ओढीने येऊन मिळते व समर्पित होते तशी मलाही माझ्या मातृभूमीची ओढ लागली आहे.
तू मला माझ्या मातृभूमीचा असह्य असा  विरह घडवशील तर तुझे ज्या सरितेवर प्रेम आहे त्या  सरितेचाही विरह तुला होईल,
समजा  नदी तुझ्याकडे आलीच नाही तर तडफडणे  ,तळमळणे म्हणजे काय असते ते तुला उमजेल .तळमळण्याची जाणीव होईल.
येथे सावरकरांची कवीकल्पना वाखाणण्याजोगे आहे.अशा व्यथित मनःस्थितीतदेखिल त्यांची  प्रतिभा तेजाने चमकत होती.

या फेनमिषे हससी निर्दया कैसा 
का वचन भंगिसी ऐसा
 त्व त्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते भिऊनी का आंग्लभूमीते.
मन्मातेला अबल म्हणूनि फसविशी,
मज विवासनता ते देश
आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझी ही माता रे.
कथिल हे अगस्तिस आता रे.
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला.

शेवटच्याा कडव्यात सावरकरांची आर्तता आता आक्रमकतेत,प्रचंड आत्मविश्वासात बदलली  .आणि या वीर जातीवंत सिंहाने सागराला पाहून डरकाळी फोडली...

नदीच्या विरहाची शपथ घातली तरीही  समुद्राच्या त  लाटा किना-यावर उफाळून येऊन आदळत होत्या. फेसाळत होत्या. समुद्र निर्दयीपणे आपल्या असहाय्यतेवर हासत आहे असे सवरकरांना वाटले. ते कडाडले.
तू  माझ्या मायभूमीकडे मला नेण्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करुन निर्दयीपणे हासत आहेस...
ते सागराला निर्वाणीचे सांगतात की,तू मला माझ्या मायभूमीकडे परत नेण्याचे वचन भंग करीत आहेस.
तुझ्यावर ज्या आंग्लभूमीचे राज्य आहे तिला तू भिऊन राहतोस आणि वरुन  माझ्या मातृभूमीला अबला म्हणून फसवित आहेस 
मला माझ्या मातेचा विजनवास देत आहेस . 
आता त्यांची व्याकुळता त्वेषात परावर्तीत होते. 
जाज्वल्य राष्ट्रभक्तीने ते तेजोमय होतात  आणि त्वेषाने  सागराला सांगतात की ,
इंग्रजी भूमीवर तू माझ्या मायभूमीला कितीही भय दाखविलेस तरी माझी मातृभूमी अबला नाही तर ती सबला आहे महाशक्तीशाली आहे आणि  याची प्रचिती तुला निश्चितच येईल सागरा...
माझी भारतामाता दुर्बल मुळीच नाही तर ती सामर्थ्यशाली  आहे. ती पारतंत्र्याची शृंखला  झुगारुन देऊन स्वतंत्र होणार आहे हे विधिलिखितच  आहे व तिचे सामर्थ्य किती महान आहे याची अनुभूती तुला येईलच हे पक्के ध्यानात ठेव सागरा...
आता जर तू माझे ऐकणार नसशील तर आमच्या अगस्ती ॠषीला तुझे गा-हाणे सांगावे लागेल ज्या महान अगस्तिने एका आचमनात रागाने तुला पिऊन टाकले होते त्याचे आम्ही वंशज आहोत.तुला आम्ही निश्चितच धडा शिकवू.
असा शेवटचा निर्वाणीचा इशारा सावरकर सागराला देत आहेत.

मातृभूमीवरील नितांत,उच्चकोटीच्या प्रेमाचे हे एकमेवाद्वितीय गीत आहे असे मला वाटते. मायभूमीवरील  उदात्त प्रेम या वीरपुरूषाच्या शरीराच्या पेशीपेशीतून ओसंडून वाहात होते. मंगेशकर बंधूभगिनींनी या अलौकिक काव्याला आपल्या मृदू ,कोमल,स्वरांनी व देशभक्तीच्या महान भावनेने  रत्नजडित केले आहे.
 इसवीसन 1909 मध्ये स्फुरलेले  गीत, शतकानंतरही आजही.
ताजे टवटवीत,कर्णमधुर वाटते. गीत ऐकताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात.राष्ट्रप्रेमाच्या लहरी मनात,शरीरात वाहतात.वातावरण पवित्र होते.

मातृभूमीच्या विरहाची ही व्याकुळता ,अगतिकता ऐकून 
राष्ट्राभिमान ,समर्पित देशभावना जाणवून आपण देशप्रेमाच्या पुलकित  भावनेने गहिवरून जातो.
सावरकरांच्या आणि आपल्या मातृभूमीच्या चरणी नतमस्तक होतो.
असे हे चिरंतन,महान प्रेरणादायी अद्वितीय गीत ऐकायलाच हवे.

सावरकरजयंतीच्या दिवशी वीरमहापुरुष वि.दा.सवरकरांना शतशः नमन.
©️डॉ._जयश्री_गढरी.मुंबई
28 मे 2021

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......