Saturday, August 14, 2021

8

#बीड डायरी.
#नागपंचमीच्या आठवणी.
12ऑगस्ट 2021
©️®️डॉ.जयश्री _राऊत_ गढरी_मुंबई
लहानपणी बीडला असताना, श्रावणाचे आगमन होण्यापूर्वीच नागपंचमीची चाहूल लागायची. नागपंचमीच्या निमीत्ताने स्त्रिया, मुली नवीन कपडे, साडी, लुगडे खरेदी करीत असत. नागपंचमीच्या दहापंधरा दिवस आधीच बलभीम चौकातील 'श्रीकृष्ण क्लाॅथ' या दुकानात नवीन कापड विकत घेतले जाई. श्रीकृष्ण क्लॉथचा दुकानदार   कांउंटरच्या मापानेच मीटरचे मोजमाप  घेऊन  नवीन कापड कात्रीने टर्रर्र ssआवाज करीत फाडत असे. 
नंतर  ते नवीन हलका सुगंध म्हणजे  नवीन कापडाचा वास नाकात भरून घेऊन  कापड टेलरकडे शिवायला टाकले जाई..
नागपंचमीच्या आधी स्त्रियांची शॉपींगची दुकानं म्हणजे धोडींपु-यातील 'लक्ष्मीनारायण ' किंवा ठक्कर बिल्डींगमधील पाय-या चढून वरती असणारे रस्त्यावरील दुकान.

या दुकानांतून 'गणपती छाप'लालभडक रंगणारी मेंदी, कानातले, गळ्यातली माळ, टिकल्या आणि नवीन फॅशन च्या बांगड्यांची खरेदी होत असे.
पंचमीच्या आधी आषाढी अमावस्येला दिवे, समया , देवाची भांडी चिंचेच्या कोळाने व खड्या मीठाने घासूनपुसून लख्ख होत व त्यांची पाटावर मांडून पूजा होई.  त्यावर आघाड्याची पाने आणि फुले वाहायची. श्रावणात आघाड्याला खूपच मान होता.  बीडला श्रावणाच्या आगमनाची तयारी अशी जोरात व्हायची.

श्रावण महिना सुरू होताच हिन्दुस्तान स्टोर्स मधून आणलेला 'जिवतीचा' फोटो घराघरात भिंतीला चिकटवला जायचा. तोच पुढच्या वर्षीही वापरायचा.काहीजण  तो फोटो लॅमिनेट  करून घेत.
नागपंचमीच्या एकदोन दिवस  आधीच बीडला  मेंदी लावण्याचा उत्सव रंगे 
एकदम उत्साहाचे वातावरण.!
 मेंदी जास्तीतजास्त गडद रंगावी यासाठी विविध प्रयोग होत. मेंदी उकळलेल्या चहापत्तीच्या पाण्यात भिजवणे, लोखंडाच्या तव्यावर भिजवणे, मेंदीत कात टाकणे.
जिची मेंदी अगदी डार्क चॉकलेटी,थोडी काळपट होईल ती  मुलगी नशीबवान असे. सगळ्या मुली तिची रंगलेली मेंदी बघत असत.नखांनाही नखपॉलिशच्या ऐवजी मेंदीच लावली जाई.

काही हौशी मुली ,स्त्रिया बीडमधील  मेंदीचे झाड  बहुतेक खासबागेकडे असावीत मेंदीची झाडे!शोधून त्या काटेरी झुडूपाची पाने खुडत. दगडाच्या पाट्यावर वरवंट्याने ती मेंदीचे पाने वाटीत. ही पानाची मेंदीही छानच रंगून येई.
नागपंचमीच्या आदल्या भावाचा उपास असे. त्याच दिवशी   रात्री मेंदी लावायचा कार्यक्रम असे. तळहातावर बोटानेच मध्यभागी मोठा टिपका काढायचा.त्याच्या आजूबाजूला कोप-यात मोठे टिपके काढायचे. काहीजणी आगपेटीची काडी मेंदीची डिझाईन काढण्यासाठी वापरीत . बोटांचा खालचा एकतृतीअंश भाग सोडून नखांसकट मेंदीचा जाड थर लावायचा. सगळ्यांच्या उजव्या हातावर अशाच प्रकारे मेंदी आई काढून देई किंवा  बहिण भावंडाकडून मेंदी काढून घेतली जाई.
नानागपंचमीच्या दिवशी सकाळीच अंधुक प्रकाशात जाग यायची. मेंदी किती रंगली याची खूपच उत्सुकता असे.
खोब-याचे तेल  अलगद हातावर चोळायचे. मेंदीचे इवलेइवले खपले निघायचे ..मेंदीचा गडद लाल रंग खुलायचा आणि मेंदीचा मंद मंद सुगंध दरवळायचा.
 साबण न लावता पाण्याने  हात धुवायचे.आणि एकमेकांची मेंदी किती रंगली ते पाहण्याचा कार्यक्रमच असे.

.नागपंचमीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे झोका!
सर्वांना झोक्याचे जणू वेडच लागे. झोक्याचे स्वप्न लहान मुलांना नागपंचमीच्या कितीतरी दिवस आधी पडायचे.
सोल (जाडसर असा मजबूत दोरखंड) शोधून ठेवला जायचा. घरातील छताच्या कड्यामध्ये सोल टाकून छोट्या मुलांसाठी घरातच झोका बांधला जायचा. 
बसल्यावर सोल टोचू नये म्हणून त्यावर जाड सोलापूरी चादर किंवा जाड सतरंजी टाकली जाई.
या झोक्यावर बसण्यासाठीही नंबर लागत. संख्या ठरवली  जायची पन्नास, शंभर झोके घ्यायचे. त्याप्रमाणे झोका खेळला जायचा.सोल हाताला खूप टोकायची,पण झोक्यावरून काही  उतरावे वाटत नसे.

ज्यांच्या अंगणात कडुलिंबाचे, पिंपळाचे झाड असे त्यांच्याकडे तर उंचच उंच झोका बांधला जायचा. दुहेरी सोलीच्या या झोक्यावर बसता यायचे आणि उभेही राहता यायचे.छोट्या मुलीला झोक्यावर बसवायचे स्वतः उभे राहून उंचच उंच झोका घ्यायचा. खूपखूप थ्रिल वाटायचे.खूप खूप मजा यायची!

दोन मुली झोक्यावर  एकमेकींकडे तोंड करून उभे राहात, एक मुलगी थोडी वाकुन झोक्याला उंच घेऊन जाई. तिच्या समोरची मुलगी ताकदीने तिच्यापेक्षाही उंचीवर झोका घेऊन जाई. खूप खूप उंच जाई झोका ! मज्जाच मज्जा येई.

कधी बीड शहरालगत  कोणाच्या शेतात बांधलेल्या उंच झोक्यावर बसण्याची संधी मिळे. त्या झोक्यावर उंचच उंच झोका घेतला की स्वर्ग फक्त दोन बोटे उरे.

 नागपंचमीला मुली, स्त्रिया नवीन कपडे, साड्या घालून नटून थटून एकमेकींना भेटत.  नागपंचमीच्या दिवसात बीडला ज्वारीच्या लाह्या करायची भट्टी लागे. बहुतेक जव्हेरी गल्लीत भट्टी होती. ज्वारी पाण्यात भिजवून रात्रभर सुती कापडात बांधून ठेवायची व दुस-या दिवशी भट्टीतून मोठाच डबा भरुन खमंग लाह्या करून आणायच्या. जिवतीच्या फोटोतील नागासमोर समोर दुध व लाह्या ठेवायच्या .
या लाह्यांना कधी फोडणी द्यायची तर कधी दह्याबरोबर खायच्या.

नवविवाहितेला सासरहून माहेरी आणण्याकरिता  मुलीचा सख्खाभाऊ चुलतभाऊ  किंवा मावसभाऊ पाठवून नागपंचमीला माहेरी बोलावले जाई.
माहेरी आलेल्या मुली,छोट्याछोट्या मुली नटूनथटून रात्री एकत्र जमत.फेर धरून गाणी म्हणत.
माहेरवाशीणी , झिम्मा, खेळत असत. घागर फुंकत. त्यांची फुगडी बघण्यात तर भान हरपून जात असे   त्यांचे खेळ खूप रंगात येत. त्यांचे खेळ संपूच नयेत असे वाटे.
( प्रिय मित्रमैत्रिणींनो ,
ही पोस्ट शेयर करू शकता पण माझ्या  नावासकट करावी.
यापूर्वी माझी  पोस्ट माझे नाव काढून या ग्रुपवर शेयर केली होती. म्हणून ही विनंती.
धन्यवाद 🙏)

©️®️डॉ.जयश्री_ राऊत_ गढरी_मुंबई
12ऑगस्ट 2021

(फोटो सौजन्य  गुगल )
.


सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......