Thursday, October 7, 2021

नवरात्रोत्सव ( बीड डायरी)
©️®️डॉ._जयश्री  _राऊत_गढरी _मुंबई 
दि.8ऑक्टोबर 2021

लहानपणी नवरात्र सुरू झाले रे झाले की, खंडेश्वरीला जायची ओढ लागायची.
अगदी भल्या पहाटे उठून आई बंबात पाणी तापवायला ठेवायची. आम्ही सगळी बहिणभावंडे साखरझोपेतच असायचो. बंबात आंघोळीसाठी तापविलेले कढत पाणी अंगावर घेतले की झोप, आळस कोठल्याकोठे पळून जाई.
त्या काळात बीडला कंदील किंवा साठ वॅटचे बल्बच होते बहुतेक सर्वांकडे. रस्त्यावर मात्र नगरपालिकेचे मंद लाईट प्रकाशत असायचे.
सर्वांची तयारी झाली की पहाटे पाचच्या सुमारास आम्ही सर्वजण  कधीकधी शेजारीपाजारीही खंडेश्वरी
ला जायला निघायचो.

माळीवेस, दत्तमंदिर नंतर  नदीवरचा पूल ओलांडला की चमन लागायचे . चमनच्या समोर चमनच्या कुंपणाच्या आतील पांढऱ्याशुभ्र  मंद सुगंधी बुचाच्या फुलांचा  सडा पडलेला असायचा. 
.ती  फुले वेचायला आम्ही  लहानमुलेमुली पुढे धाव घ्यायचो.
मिळतील तेवढी ताजी बुचाची फुले खंडेश्वरीदेवीला वहायला गोळा करायचो.
अंधारातच जुने बीड लागायचे.
जुन्या बीडमधील घरांसमोर त्या घरातील मुली, स्त्रिया कंदील, टॉर्च घेऊन अंधारातच सुरेख रांगोळी रेखाटताना दिसायच्या. त्या रांगोळीत रंगही सुरेख 
भरायच्या .
स्त्रिया मुलांचे छोटे ,मोठे  अनेक गट खंडेश्वरीच्या दर्शनाला जाताना दिसायचे.
जुने बीड संपताच वस्ती नसलेला भाग ओलांडला की खंडेश्वरीची वाट लागायची. अंधार संपून प्रकाशाची चाहूल  लागायची म्हणजे  बीडच्या भाषेत उजाडायला लागायचे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी टेकडीवजा खडकांचे उंचवटे दिसायला लागले की खंडेश्वरीदेवी जवळ आली ही खूणगाठ मनात पक्की होई.
त्या खडकमातीच्या मिनी  टेकड्यांचा  थोडासा अरुंद रस्ता संपला की सुंदर  अशा निसर्गरम्य , विस्तीर्ण परिसरात प्रवेश व्हायचा.आणि.......
'मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला,
स्विकारावी पूजा आता उठी उठी गोपाला' या   स्वर्गीय आवाजातील भूप रागातील मधूर गाणे कानावर पडायचे. मनात, शरीरात एक चैतन्य ओसंडून वहायचे. सकाळी लवकर उठून लांबलांब  पायी चालत आल्याचा शीण या गाण्यातील सुरेल स्वरांनी कुठल्या कुठे पळून जायचा.

त्यावेळी असे वाटायचे, खंडेश्वरीच्या आजूबाजूचे डोंगरच 'मलयगिरी ' पर्वत असावेत आणि देवीला जागे करण्यासाठीच ही भूपाळी लावली असावी. खंडेश्वरीच्या संपूण॔ परिसरात कुमार गंधर्वांच्या सुरेल स्वरांनी प्रसन्नतेचा वर्षाव होत असे.

आजूबाजूला फुले विकणा-या स्त्रिया  त्यांच्याकडून फुले विकत घेतल्यावर दर्शन करून येईपर्यंत आनंदाने पादत्राणे सांभाळीत . झेंडूच्या फुलांचा तीव्र ,मंद सुवास संपूण॔ वातावरणात दरवळत असायचा.

बीडकर अतिउत्साही ! घरातून कितीही लवकर निघाले तरी देवीच्या बाहेरच्या दरवाज्यापर्यंत तरी रांग असेच. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक  दोन स्त्रिया कपाळाला मोठे कुंकू लावून हिरवी इरकल साडी आणि चोळी घालून  गळ्यात कवड्यांची माळ घालून परडीतही कवड्याची माळ घेऊन बसलेली असे. 'आई राजा उदो उदो ' असे म्हणत जोगवा मागीत असत.

स्त्रियांची आणि पुरूषांची अशी दर्शनाची स्वतंत्र रांग असे. स्त्री आणि पुरूषांच्या गाभा-यातील प्रवेशापूर्वी दोन सिंहाच्या प्रतिकृती होत्या. अगदी छोट्या दरवाज्यातून नतमस्तक होऊनच देवीच्या गाभा-यात प्रवेश करायला मिळायचा. आम्ही मुले चमनच्या  झाडांची आणलेली बुचाची फुले देवीला वाहत असू.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर डाव्या बाजूने बाहेर पडल्यावर मंदीराच्या आवारात लांबलचक ओसरी होती . तिथे पुष्कळ परडेकरी , जोगवेकरी बसलेले असत.
प्रदक्षिणा पूर्ण होण्यापूर्वीच उजवीकडे मंदीराबाहेर पडण्याचे दार होते. दर्शन झाल्यावर या दारातून बाहेर पडले की , कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचे 'ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ,
भेटीत तृष्टता मोठी ' हे सुमधूर गीत कानावर पडायचे.
या गीतातील हसणे, रुसणे, रुसणे ,हसणे कानात रुंजी घालायचे. परतताना कधी रेवड्या, फुटाणे , भाजलेले शेंगादाणे असा खाऊ मिळायचा.
क्वचितवेळा फुगे, पिपाणी,' पेंडूलम' सारखा रबराने खालीवर करण्याचा बॉल, कागदाच्या घडीची फोल्डींगची चित्रफित , दुर्बिणीसारखा सिनेमा अशा खेळणी मिळायच्या.
दुरूनच दीपमाळेचे दर्शन घेऊन आणि दोनच मिनीटे बसून लगेचच निघायचे. 
येताना जुन्या बीडमध्ये घरांच्या दारापुढे स्त्रियामुलींनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या स्वागत करीत असत. त्या रांगोळ्या थांबून पाहातच राहावे असे वाटे, पण घरी परतण्याची घाई असे.
पोटात भुकेने खड्डा पडायला लागे. आम्ही घरी पोहोचल्यावर चहापोळी खाऊन शाळेकडे धूम ठोकत असू.
स्त्रिया नवरात्रीचे उपवास करीत. या उपवासाचे अनेक प्रकार असत. पूर्ण नऊ दिवस उपवास,
फक्त चहा पिऊन म्हणजे कडक उपास,साबुदाण्याची खिचडी , भगर खाऊन,
एक वेळा जेवण करून,
उठता ,बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी अशा विविधप्रकारे  स्त्रिया  झेपेल  तसे नऊ दिवस उपवास करीत.

नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला पहिली माळ, दुसरी माळ असे म्हणत व घरातील घटावर प्रत्येक दिवशी पानाफुलांची माळा बांधीत.
नवरात्रीतील रविवारी खंडेश्वरीचा जाण्यासाठी  आमच्यासाठी लवकर उठण्याची अजिबात आवश्यकता नसे.
आरामात उठून खंडेश्वरीच्या सहलीची तयारी करायची.
धपाटे,वांग्याचे भरीत, शेंगदाण्याची चटणी , मिरचीचा ठेचा असा बेत असायचा.
तीनचार खाण्यांचा  ज्याला टिफीनचा डबा म्हणत तो भरला जायचा. नायलॉनच्या पिशवीत सर्व सामान व्यवस्थित भरून शेजारची मुलेमुली, काकी, काका मावशींसकट सहल निघायची खंडेश्वरीची! इतरही छोटी मुलेमुली कुटुंबियासमवेत सहलीला यायचे. रविवारच्या सहलीत घरी परतण्याची घाई नसायची. खंडेश्वरीच्या सगळ्या परिसरात फिरायचे .
खंडोबाच्या मंदीराच्या शांत परिसरात जाऊन दर्शन घ्यायचे.
दीपमाळेवर चढण्यासाठी उड्या मारायच्या आणि खूप प्रयत्न करून प्रथम दीपमाळेच्या ओट्यावर व नंतर दीपमाळेवर चढायचे आणि अहाहा.....बीडचा संपूण॔ नजारा पहायचा. छोट्याशा टेकडीवर अंगतपंगत सोबतच सहभोजन करायचे. पकडापकडीचा खेळ खेळायचा. दिवसभर .हुंदडून मग घरी निघायचे.

सप्तमीला आणि अष्टमीला देवीला कडाकण्यांचा फुलोरा वाहिला जायचा. हा फुलोरा प्रथम घरातील घटावर बांधला जायचा आणि खंडेश्वरी देवीपुढेही मंदीराच्या गाभा-यात बांधला जायचा.
निरनिराळ्या डिझाईनचा हा फुलोरा असे. यात छिद्रांच्या ,नक्षीकाम केलेल्या खुशखुशीत पु-या , देवीचा आरसा, वेणी, कंगवा ,कुंकवाचा करंडा असे प्रकार असत.
या कडाकण्यांची चव अप्रतिम असे.
कडाकण्या वर्षातून एकदाच होत व सर्व मुले यावर अक्षरशः ताव मारीत. कडाकण्या चहाबरोबरही खूप अप्रतिम लागत.
विजयादशमीला मात्र फक्त मुले आणि पुरूषमंडळीच खंडेश्वरीला सीमोल्लंघनाला जात.
समस्त पुरुषमंडळी मुले दस-याला आवर्जुन टेलरकडून नवीन कपडे शिवून घेत. दस-याला नवीन कपडे शिवायचेच हा नियमच बाबा आणि भावांसाठी  होता.पुरूष नवीन कपडे , डोक्यावर टोपी आणि टोपीत घरी उगवलेल्या घटातील धान्याच्या गवताचा तुरा खोवीत.
खंडेश्वरीहून सीमोल्लंघनाहून आलेल्या पुरूष मंडळींना, मुलांना स्त्रिया ओवाळीत असत. त्यानंतर 'सोन्याची 'म्हणजे आपट्यांच्या पाने एकमेकांना देत . छोटी छोटी मुले वडिलधा-यांना आपट्यांची पाने देऊन त्यांच्या पाया पडत. सर्वजण एकमेकांना भेटत. आपट्यांच्या पानांबरोबर प्रेमाची, आपुलकीची देवाणघेवाण होई. खंडेश्वरीचे आणि नवरात्रीचे असे अतूट नाते मनात खोलवर रूजले आहे.  (My repost with few changes)
 पोस्ट शेयर करणार असाल तर कृपया नावासकट करावी ही सर्वांना  विनंती .
©️®️डॉ_जयश्री _राऊत_गढरी__ मुंबई
8 ऑक्टोबर 2021

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......