Wednesday, November 10, 2021

दिवाळीचा_ किल्ला _ सांस्कृतिकसांस्कृतिक_ ठेवा

#दिवाळीचा- किल्ला--सांस्कृतिक ठेवा

©️®️#डॉ.जयश्री_ गढरी_ मुंबई
10 नोव्हेंबर 2021 


'मंगलदेशा,पवित्र देशा,दगडांच्या देशा,'असे ज्याचे वर्णन आहे त्या आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा म्हणजे 'दिवाळीचा किल्ला'!

ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,सुराज्य प्रस्थापित केले,त्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष म्हणजेच दिवाळीचा किल्ला होय !

बालगोपाळांचे भावविश्व समृद्ध करणारा,निर्मितीचा आनंद,सांघिक भावना,इतिहासाबद्दल ,आपल्या मातीबद्दल प्रेम ,आपुलकीची भावना दृढ करणारा !लहानपणी दिवाळीला मामांकडे खूप वेळा केला होता खूप मजा केली होती .हा  किल्ला एक अत्यंत जिव्हाळ्याचा! 

दिवाळी हा आपल्या सणांचा राजा आणि 'दिवाळीचा किल्ला' हे समृद्धीचे ,सुरक्षिततेचे प्रतिक!

यावर्षी आम्ही नवरात्रीपासूनच घरात किल्ला तयार करण्याची योजना आखली.फ्लॅटसंस्कृतीत किल्ला तयार करणे थोडेसे कठीण होते .आम्ही घरातील सदस्यांनी आणि सोसायटीतील काही मुलांनी मिळून किल्ल्याची योजना ठरविली.

फुलझाडांच्या नर्सरीत जाऊन दोन वेळा माती आणली.आमच्या घराच्या गॅलरीत एका कोप-यात जागा निश्चित केली.आम्ही बिल्डींग मटेरियलच्या दुकानात जाऊन वीसबावीस विटा खरेदी केल्या.त्या विटांनी किल्ल्याची सीमारेषा तयार केली.घराच्या मागच्या बाजूला मुंबई मेट्रोचे काम चालू आहे,तेथून मुलांनी सकाळी लवकर जाऊन छोटे छोटे दगड व खडी आणली.

काही विटा उभ्या तर काही आडव्या रचल्या.या विटांवर ज्यूटचे गोणपाट चढउतार होईल अशा रितीने अंथरले ,त्यावर नर्सरीतून आणलेली माती पसरली. पाण्याने ती माती गोणपाटावर लिंपली.काही प्रमाणात कोरडी मातीही या चढउतारावर पसरली.डोंगरासारखे दृश्य तयार झाले.मुलांनी पुठ्ठा आणून त्याला कापून काळ्या पांढ-या रंगांनी रंगवून बुरूज तयार केले.बुरूज करायला त्यांना खूप मजा आली.

मातीच्या डोंगरावर बुरूज बसवले.डोंगरावर,आम्ही सिंहगडावरून आणलेले मावळे उभे केले.सर्वात उंचावर  अर्थातच शिवाजीमहाराज !.त्यांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन केले.भगव्या रंगाच्या कागदाचा  हिंदुत्वाचा ध्वज तयार केला व शिवरायांजवळ दिमाखात रोवला! डोंगराच्या खालच्या बाजूला, एका पसरट प्लास्टीकच्या डब्याला  मातीत छोटा खड्डा करून सर्व बाजूंनी  मातीने  फिक्स केले  त्यात पाणी टाकले व छोटासा पाण्याचा तलाव तयार झाला.आता  मातीवर अळीव,गहू,मूग पेरले,आणि त्यावर रोज सकाळी संध्याकाळी पाणी शिंपडले.हळूहळू त्यातून  इवलेसे अंकुर यायला लागले.हिरवाई पसरायला लागली. जंगलासारखे दृष्य दिसायला लागले.त्यावर खेळणीतील प्राणी मांडले.  एक बैलगाडीही ठेवली .दिवसातून किमान तीन वेळा त्या हिरवळीचे निरीक्षण मुले करीत .अळीवाचे शेत खूपच सुरेख दिसत होते.या नवनिर्मितीचा मुलांना व आम्हांला खूप आनंद होत आहे आणि या किल्ल्याचे मुुलांना खूप अप्रूप वाटतेय! 

 महाराष्ट्रात शिवरायांनी  स्वाभिमान जागवला स्वराज्य  निर्माण केल्यावर या सुराज्याचे  शत्रू ,उन,वारा ,पाऊस या सर्वांपासून रक्षण करणारे सह्याद्रीतील हे गडकिल्ले! शिवरायांनी व मावळ्यांनी या गडकोटांवर अतोनात प्रेम केले . गडकिल्ले म्हणजे, सुरक्षितता ,स्वातंत्र्य,स्वधर्म,समृद्धी,सुराज्य यांचे प्रतिक!ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या एक अनमोल ठेव्याचा जनरेशन नेक्स्ट ला परिचय करून देण्याचा हा प्रयत्न !

'दिवाळीचा किल्ला हा ' अर्थातच आनंद ,उत्साह, ऊर्जा चैतन्य  वृद्धींगत करणारा एक  मौल्यवान ठेवा!

(आम्ही केलेल्या दिवाळीच्या किल्ल्याचे फोटो शेअर करीत आहे)
©️®️डॉ.जयश्री_ गढरी_.मुंबई

10नोव्हेंबर 2021

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......