#सोनचाफा
सकाळी घराच्या हॉलमध्ये मंद सुवास दरवळत होता.
आठनऊ महिन्यांपूर्वी कुंडीत लावलेला सोनचाफ्याने सुगंधाचा वर्षाव केला होता. खूपच प्रसन्न वाटत होते.
.
एकाचवेळी सोनचाफ्याची दहापंधरा फुले फुलली होती. तीसपस्तीस कळ्या पोपटी रंग परिधान करून सकाळच्या कोवळ्या कोवळ्या उन्हात सूर्यकिरणांनी स्नान करीत होत्या.
'कोरोना लॉकडाऊन' मुळे मला आलेले उदासिनतेचे मळभ क्षणात नाहीसे झाले. आणि मन आनंदाने बागडू लागले.
'सुवर्णचंपक फुलला विपीनी '
या बालकवींच्या कवितेची आठवण झाली. खरे तर सोनचाफ्याची अनावर ओढ लागली ती लहानपणी बालकवींची ही कविता वाचल्यापासूनच.
'सोनचाफा' तसा सहजासहजी न मिळणारा सदाहरित असा पुष्पवृक्ष. सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा. दिसताक्षणीच मनाला भुरळ पाडणारा .
भारतीय मूळ आणि अनादी काळापासून असलेला हा सोनचाफा आपल्याला अक्षरशः वेड लावतो.
शिवरायांनी 'पन्हाळा 'येथे सोमेश्वरास एक लाख सोनचाफ्याची फुले अर्पण केली होती असा इतिहासात उल्लेख आहे.
सोनचाफ्याचा अस्सल बावनकशी सोन्यासारखा पिवळाधम्मक रंग. या रंगामुळेच याचे नाव 'सोनचाफा' पडले असावे.
आठनऊ महिन्यांपूर्वी खूप शोध घेतल्यानंतर एका बागेतून सोनचाफ्याचे कलमी रोप आणले. या रोपाची खिडकीत ग्रिलमध्ये अगदी आपुलकीने मोठ्या कुंडीत प्रतिष्ठापना केली. या रोपाला नित्यनेमाने शेणखत, गांडूळखत, ऑरगॅनिक खत घातले. अगदी लहान मुलांसारखीच त्याची काळजी घेतली.
सोनचाफ्याला नवीन कोवळी कोवळी 'बालपालवी 'फुटली. फांद्याच्या टोकाला हिरव्या कळ्या दिसायच्या. असे वाटायचे ,आता याची फूले उमलणार पण, त्या हिरव्या कळ्यांतून हिरवी इवलीशी पानेच फुटायची फूले उमलली नाहीत म्हणून अपेक्षाभंग व्हायचा.
पण या कोवळ्या पानांचे उमलणेही हळुहळू आनंददायी वाटू लागले. अशाप्रकारे रोपाची वाढ होत होती. रोपाच्या पर्णसंभाराची वृद्धी होत होती.
मन आशानिराशेच्या हिंदोळ्यावर डुलत होते. फुले येणार की नाही ?
आणि एकदाची प्रतिक्षा संपली. पानांऐवजी जाडसर फिकट हिरव्या कळ्या दिसू लागल्या . अवर्णनीय आनंद झाला. या हिरव्या कळ्या टोकाला एका आवरणात असायच्या .
एका पोपटी रंग ल्यालेल्या कळी ने सुवर्णकांतीचे पिवळेधम्मक वस्त्र परिधान केले. कळीचा संरक्षक असलेला जाडसर पापुद्रा अलगदपणे कुंडीत गळाला. आणि कळी खुलली.
सगळ्या अर्धोन्मिलीत कळ्या हळुवार खुलत होत्या. सर्व आसमंत सुगंधाने दरवळून गेला होता. खूप ताजेतवाने वाटत होते.
'कोरोना लॉकडाऊन 'मध्ये तर सोनचाफ्याने मला अक्षरशः मोहित केले.
सध्या अष्टौप्रहर सोनचाफ्याला न्याहाळणे, निरनिराळ्या अवस्थेत असलेल्या कळ्यांचे निरीक्षण करणे ,फांदीला प्रेमाने जवळ घेऊन नाकाजवळ नेऊन सुवास घेणे ,सगळ्या अँगलमधून झाडाचे,कळ्यांचे फुलांचे फोटो काढणे चालू आहे.
हवेच्या झुळुकीबरोबर झोका घेणा- या ही सोनपुष्पे मिरवणा-या फांदीचा,झाडाचा व्हिडीओ काढणे हे ही नित्याचेच झाले आहे.
मनाला संमोहित करणारा गोडसर सुगंध,
लोभस असे आकार आणि रचनेचे सौंदर्य, आपली नजर न हटणारा नयनरम्य रंग ,
आणि मुलायम स्पश॔!
निसर्गदेवतेने रंग, रूप, वासाचे भरभरून दान सोनचाफ्याच्या पदरात टाकले आहे. मी या सगळ्यांची भरभरून लयलूट करीत आहे.
सोनचाफ्याची टपोरी कळी तर खूपच आकर्षक असते. म्हणूनच 'चाफेकळी नाक' असे एखाद्या सौंदर्यवतीच्या नाकाला उपमा दिली जात असावी.
सोनचाफ्याच्या फुलाच्या देठाजवळ एक सुंदर पान असते आपण जेंव्हा पानासकट देठाचे फूल तोडत ते फूल अतिशय शोभिवंत असते. जसे पिवळ्या रेशमी उंची साडीला हिरवी किनार!
अतिमोहक वाटते असे पानासहित सोनचाफ्याचे फूल.
सोनचाफ्याची फूले सुकल्यानंतरही त्याचा सुगंध टिकतो.
एके दिवशी सकाळी अकराच्या सुमारास माझे सोनचाफ्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे चालू होते ,तेवढ्यात एक काळ्या पंखावर असंख्य छोटेमोठे पांढरे ठिपके असलेले मोहक फुलपाखरू सोनचाफ्याच्या एका फुलावरून दुस-या फुलावर मधुप्राशनासाठी बागडत होते. खूपच चपळ आणि नाजुक होते.
फुलपाखराच्या हळुवार स्पर्शाने फुलाची पाकळी किंचीतशी हलल्याचा भास झाला. सोनचाफ्याची पाकळी आणि फुलपाखराचे पंख यात अधिक मुलायम काय ?असा प्रश्न मला पडला.
एका सकाळी भ्रमरही त्याचे संगीत गुणगुणत आला सोनचाफ्याच्या मधुसेवनासाठी! सोनचाफ्याचा पुष्परस खूपच मधूर असावा. या भ्रमराला पाहून वसंतराव देशपांडे यांच्या ,
'घेईं छंद मकरंद प्रिय हा
मिलिंद मधुसेवनानंद
स्वच्छंद, हा धुंद'
या मधूर स्वरांची प्रकर्षाने आठवण झाली.
अर्धोन्मीलित कळीचे दुस-या दिवशी पूर्ण चक्राकार कमळासारखे फुल उमलते.निसर्गरुपक सुवर्णकाराने आपले सर्व कौशल्य पणाला लावून घडविलेली सुवर्णकर्णफुलेच जणू!
पाच छोट्या आणि पाच मोठ्या अशा दहा मोहक पाकळ्या !असंख्य परागकण आणि एक स्त्रीकेसर!
किती तरी वेळ या सोनचाफ्याच्या कलिकांवरुन व फुलांवरुन दृष्टीच हलवावी वाटत नाही. अर्धवट उमललेल्या पिवळ्याधमक कळ्यांचे सौंदर्य अत्यंत मनमोहक ! अक्षरशः भानच हरपून जाते.
खिडकीत, आणि माझ्या मनातही सोनचाफ्याचा ऋतू बहरला आहे. सोनचाफ्याने मनावर मोहिनी घातली आहे.
'टॉप ऑफ द वर्ल्ड 'वाटत आहे.
आपण सगळे कोरोनाच्या संकटात आहोत काळजी, चिंतेत आहोत. माझ्या बाल्कनीतील सोनचाफ्याचा स्वर्गीय सुगंध या परिस्थितीत माझ्या मनावर फुंकर घालतो. सोनचाफ्याच्या कळ्याफुलांच्या दर्शनाने अंगात चैतन्य येते .
©️ डॉ.जयश्री गढरी.मुंबई .
No comments:
Post a Comment