Sunday, June 7, 2026

बकुळी

#डॉ.जयश्री गढरी मुंबई .
#5 जून 2026
#.पर्यावरण दिन 

'या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले, 
इथेच माझ्या स्वप्नांचा ,
एक रेशमी झुला ,
तिनेच आसवे पुसली माझी ,ह्रदयामधला गंध दिला,
चांदण्यातील सोनकवडसे माझ्यासाठी अंथरले...
बकुळी माझी सखी जीवाची,
जन्मांतरीचे प्रेम जुने....
किती  सुरेख गीत आहे हे बकुळीबद्दल.....

 'बकुळी' पहिल्यांदाच भेटली ती पहिलीच्या 'बालभारती 'पुस्तकात....
'या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या' ..या चिमुकल्या कवितेतून....पाच वर्षांची असताना तिची ओळख तर अशी झाली.....पण बकुळी काही तशी सहजासहजी भेटणारी मुळीच नव्हती....कधीतरी वाचलेल्या साहित्यातून,तर कधी गाण्यांतून तिचे नाव ऐकू यायचे....शाळेत सातवीला  असताना  मैत्रिणीने दोन बकुळीची फुले दिली...पुस्तकाच्या पानात जीवापाड जपून ठेवली....अभ्यासाचा कंटाळा आला की पुस्तकातील बकुळ फुलांचा सुवासाने की मन उल्हसित व्हायचे....बकुळीला भेटण्याची खूप उत्सुकता होती......

आणि अचानक ती भेटली.....माझे डॉक्टर होण्याचे  स्वप्न साकार करणा-या आमच्या मेडीकल कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या एका बाजूच्या कोप-यात.....एम.बी.बी.एस.च्या पहिल्या वर्षाला असताना, तिच्या जवळून कितीतरी लेक्चर्स ला गेले ,पण मी तिला ओळखत मी नव्हते....एकदा लेक्चरवरून परतताना मंद,गोड ,लहानपणी पुस्तकात जपलेल्या  बकुळीच्या फुलांसारखा सुगंध आला...सोबत एक फुलवेडी मैत्रिण होती ती म्हणाली....'हा तर बकुळीचा आहे सुगंध.'.मी अतिशय आनंदून गेले...ही बकुळी ,आणि ही तिची फुले?.....मी अक्षररशः बकुळीला मिठीच मारली... .तिचे मोहक सौंदर्य पाहातच राहिले.उंच उड्या मारून खालच्या बाजूच्या फांद्यांवरची  फुले तोडली....मला बकुळी प्रत्यक्ष भेटली ती अशी... ..एम.बी.बी.एस.होईपर्यंत मी बकुळीशी हितगुज करीत असे. परीक्षेचा ताण,एकाकीपणावर ती तिच्या अलौकिक अशा  सुवासाने हळुवार फुंकर घाली.....

एम.बी.बी.एस.च्या दुस-या वर्षाला असताना आमची मुलींची  सहल वेरुळला गेली....वेऱुळची  जगप्रसिध्द शिल्पाकृती पाहून आश्चर्य आणि खूप  आनंद झाला या आनंदात अजून भर पडली ती.. घृष्णेश्वराच्या मंदीरात एका नयनमनोहर झाडावर नजर खिळली.....ती बकुळीच होती...खूप वेळ तिला न्याहाळीत होते...
एम.बी.बी.एस.पूण॔ झाल्यावर मेडीकल कॉलेजमधील बकुळीची आणि माझी ताटातूट झाली.अधुनमधून तिची आठवण यायची......
क्वचित कधीतरी स्टेशनला गजरे विकणा-या स्त्रियांकडे बकुळीच्या फुलांचा गजरा दिसला तर मी आवर्जुन विकत घेई.....तिच्या धुंद सुगंधाने भारावून जाई......

दहा वर्षांपूर्वी एकदा गोव्याला मंगेशाला गेलो होतो.....मंगेशाच्या परिसरात बकुळीचे गजरे विकत घेऊन केसात माळून मंगेशाचे दर्शन घेतले होते.....मन प्रसन्नतेने न्हाऊन निघाले होते....कारण....मागे उभा मंगेश पुढे बकुळीहारच हार......
.
माझ्या हॉस्पीटलसमोर एक मेन रोड आहे.....
परवा मी हा मुख्य रस्ता ओलांडून पलिकडे असणा-या चष्म्याच्या दुकानात नवीन फ्रेम बनवायला गेले.......या दुकानात शिरता शिरताच या दुकानाला लागून असणा-या एका हाऊसिंग सोसायटीच्या गेटच्या कोप-यावर चिरपरिचीत असा बकुळीचा  सुवास आला.मी त्या सोसायटीच्या गेटजवळ जाऊन पाहिले.....माझा विश्वासच बसत नव्हता....ती बकुळीच होती. खात्री झाली .....आता संध्याकाळ होत होती...दुस-या दिवशी दुपारनंतर हॉस्पिटलचे काम आवरून बकुळीला भेटायचा निश्चय केला...

काल दुपारी चार वाजता बकुळीकडे गेले......
साधारण दहाबारा फूट उंच होती ती.असंख्य कळ्या फुलांनी बहरली होती .प्रत्येक फुलाफुलांत अत्तराची कुपीच होती जशीकाही!..आसमंतात सुवास दरवळत होता.लोक बाजूने जात येत होते.....परंतु या गंधाची वार्ता कोणालाच नव्हती. पादचा-यांना कोणालाच तिचे अप्रुप नव्हते....
.दोन तीन जणांनी विचारले, हे 'औषधी' झाड आहे का?..मी त्यांना 'होय' म्हटले.....माझा बकुळीशी संवाद चालला होता..... मी तल्लीन झाले होते. खूप वर्षांनी भेटलेल्या  जिवाभावाच्या मैत्रिणीप्रमाणे....

बकुळीच्या फुलांचा सुमधूर मधू पिण्यासाठी काही मधमाशाही गुणगुणत  होत्या....आनंदात विहरत होत्या...
खालच्या बाजूच्या फांद्या हळुवारपणे वाकवून मी बकुळीची फुले भराभर खुडत होते...
तिच्या फांद्यांवर हिरवी,पिवळी,नारंगी  फळेही दिसत होती.खूप सारी फुले गोळा केली....घरी आल्यावर या नक्षत्रांसारख्या फुलांवरून नजरच हटत नव्हती...अलभ्य लाभ झाला होता.....कानातील  कुड्यांसारखी नक्षीदार रचना....नाजूक ,नाजुक आकर्षण कळ्या!..झाडाच्या फांदीच्या हिरव्यागार  पानांच्या देठाच्या दोन्ही बाजूंनी कळ्या किंवा फुले....फांदीच्या टोकाला मात्र खूप सा-या लोभस कलिकांचा गुच्छ!..

सायंकाळी बकुळीची फुले परिसरात सुगंधाची उधळण करतात ..आणि जमिनीवर फुलांचा सडा घालतात.
मे महिन्यात सर्वजण उष्णतेने तापून जातात,त्यांच्या मनावर हळुवार आल्हाददायक फुंकर घालण्यासाठीच सृष्टीने या गोड गंधाची निर्मिती केली असावी. .उमलणारी फुले आणि नुकतीच उमललेली फुले अगदी हस्तीदंतासारखी दिसतात...नंतर हळुहळु बदामी रंगांची ,त्यानंतर तपकिरी आणि मग चॉकलेटीखा रंगांची होतात या सर्व रंगबदलाच्या क्रियेत सुगंध मात्र कमी होत नाही....फुले सुकली तरी फुलांना न सोडणारा हा  मधुर  परिमळ...
केळीच्या झाडाच्या सालाच्या तारेत गुंफून याचा गजरा गुंफतात....फुलाच्या देठाला हळुच दाबले की छिद्रांसहित फुल देठापासून वेगळे होते. ...आणि गजरे बनवणे खूपच सोपे होते.....

अनेक आयुर्वेदिक गुणधर्म या झाडाचे आहेत...अत्तर ,परफ्युम निर्मितीत फुलांचा वापर करतात...घरी आणलेल्या फुलांचा आम्ही गजरा केला...येताना मी चार छोट्या फांद्या कलमे करण्यासाठी आणल्या होत्या त्या कुंडीत माती भरून त्यात रोपे बनविण्यासाठी लावल्या....असे म्हणतात की बकुळीची दोन झाडे लावली की शंभर यज्ञ केल्याचे पुण्य लाभते.
ही रोपे तयार झाल्यावर मी दोन योग्य जागा शोधून रोपांचे वृक्षारोपण करेन  आणि बकुळीच्या दोन रोपांचे रोपदान करेन.....
अस्सल भारतीय असलेल्या , आपल्या मनभावक सुगंधाने प्रफुल्लित करणा-या बकुळीची जपणुक व्हायला हवी आणि वृद्धीही !..
आपण बकुळीच्या फुलांना आपल्या ह्रदयात स्थान देतो...कितीतरी मातांच्या गळ्यात सोन्याचा 'बकुळहार' शोभून दिसतो....
आपल्या  धरणीमातेचेही  सौदर्यही बकुळीची  व इतर वृक्ष वाढवितात....
आजच्या पर्यावरणदिवसाच्या निमीत्ताने किमान दोन बकुळीची किंवा कोणतीही झाडे लावण्याचा ,ती जपण्याचा ,वृक्षसंवर्धन करण्याचा निश्चय करू या!...

#विश्वपर्यावरणदिन
#डॉ.जयश्री गढरी.मुंबई
#5 जून 2026

.

No comments:

Post a Comment

बकुळी

#डॉ.जयश्री गढरी मुंबई . #5 जून 2026 #.पर्यावरण दिन  'या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले,  इथेच माझ्या स्वप्नांचा , एक रेशमी झुला , ...