Saturday, August 29, 2020

कदंब

©️डॉ.जयश्री गढरी.मुंबई 
30 ऑगस्ट 2020 
 यमुनेच्या काठी श्रीकृष्णाने कदंबाच्या वृक्षाखालीच सुरेल बासरी वाजवून वृंदावनवासियांना मंत्रमुग्ध करून सोडले. 
श्रीकृष्ण आपल्या संवगड्यासमवेत बालक्रिडेत कदंबाच्या डेरेदार वृक्षाखालीच खालीच रमला.
 श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आपल्या गाई यमुनेच्या काठावरील कदंबवनात नेत असत. 
सर्वांना उपद्रव देणा-या 'कालिया' नागाचे मर्दन श्रीकृष्णाने कदंबाच्या झाडावरूनच उडी मारून केले.

 भारतीय पुराण, साहित्य,  संस्कृतीमध्ये ज्या वृक्षाचा वारंवार उल्लेख आहे ,असा हा सुंदर 'कदंब वृक्ष' मला माझ्या घरालगतच्या सोसायटीच्या कंपांउडवॉलजवळ आजच सकाळी नजरेस पडला. 
 अलभ्य दृष्य! 
कदंबाची असंख्य फूले फुलली होती त्यावर .

 मंद सुवास आसमंतात दरवळत होता आणि वृक्षाखाली कदंबपुष्पाच्या केशरी केसराचा केशरी हलका पिवळा सडाच पडलेला होता. माझे तर भानच हरखून गेले.!

 श्रावणात/भाद्रपदात हा कदंब असंख्य केशरी,हलक्या पिवळ्या रंगांच्या फुलांनी बहरून जातो.

गोलाकार केशरी फिकट पिवळ्या रंगाचे अगणित पुंकेसर ,मंद सुगंधाचे अत्यंत देखणे फूल!

 आय॔भट्टाने याच फुलांचा उल्लेख 5 व्या शतकात केला. आय॔भट्टाने संशोधन केले'पृथ्वी गोल आहे आणि 
सूर्याभोवती परिक्रमा करते.' त्याच्या विरोधकांनी आक्षेप घेतला, की पृथ्वी गोल आहे , फिरते तर प्राणी,वस्तू पडत का नाहीत?  आय॔भट्ट म्हणाला, 'की ज्याप्रमाणे कदंबपुष्पांचे केशर खाली पडत नाही ,त्याचप्रमाणे वस्तू,प्राणी गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडत नाही'
.
 कुमारसंभवात पार्वतीच्या गालावरच्या लालिमेला कदंबफुलांची उपमा दिली आहे.

 या भारतीय वृक्षाचा आयुर्वेदातही कदंबाच्या वापर होतो.
 ज्योतिषशास्त्रात हजारो वनस्पती पैकी 27 वनस्पतींना आणि 27 नक्षत्रांना शुभ मानतात त्यापैकी कदंबाला शतभिषा नक्षत्रासाठी निवडले आहे. 

महाकवी कालिदासांच्या मेघदूत या सुप्रसिद्ध काव्यात देखील कदंबाचा उल्लेख आहे.
 माझ्या मोबाईल कॅमे-याने काढलेले घराजवळील कदंबाचे काही फोटो! 

Friday, August 28, 2020

प्रियसखी जाई

 ©️डॉ.जयश्री गढरी-मुंबई

28 ऑगस्ट 2020

माझी प्रिय मैत्रीण 'जाई' 

.सायंकाळी खुलली आहे आमच्या खिडकीत.शुभ्रधवल कळ्यांवर हलकीशी गुलाबी छटा!

मऊ मऊ मुलायम नाजुक रेशमाच्या पोताच्या पाकळ्या,आणि त्या परिचित स्वर्गीय सुगंधाची मुक्तहस्ते उधळण करणारी माझी जिवलग सखी जाई!

बालपणी अरूणोदयी खुडलेल्या पक्व कळ्यांनी आणि उमललेल्या फुलांनी काठोकाठ भरलेली ओंजळ!

प्रभाती खुडलेल्या कळ्या सायंकाळी ताटात पसरवल्या की ,त्या अर्धोन्मिलित, उमलणार्या कळ्यांच्या दैवी सुगंधाने अवघा आसमंत दरवळतो.

या चित्त प्रसन्न करणार्या सुगंधाच्या निर्मितीसाठी सहजच ईश्वराची कृतज्ञता व्यक्त होते.जगातील कोणताही परफ्युम  हिच्या सुगंधापुढे निष्प्रभच!

श्रावणात जाईचा देवघरातील वावर,शुक्रवार,मंगळागौरी,कृष्णाष्टमी,सत्यनारायणाच्या पूजेत स्थान! जाईचे अनेक संदर्भ आणि संदर्भाचे मोहक गंध!

आयुष्याच्या निरनिराळ्या वळणावर प्रसन्न सुवासाने दुःखावर फुंकर घालणारी ,तर आनंदात भर घालणारी ,मन प्रफुल्लित करणारी माझी प्रियसखी जाई!

चमेलीचे संस्कृतमध्ये नाव चंबेली,इंग्रजीत जास्मीन, हिन्दीत चमेली,चंबाली आहे.

तर प्रियवंदा,सुरभीगंधा ही देखील जाईची नावे आहेत.

फोटोत जवळ मोगरा असल्यामुळे त्याची पानेही फोटोत आली आहेत.जाई आणि चमेली ही एकाच फुलाची नावे आहेत.

©️ डॉ. जयश्री गढरी.मुंबई

Saturday, August 22, 2020

गणपतीबाप्पा मोरया!

 गणपतीबाप्पा मोरया !
आज गणेशचतुर्थी 
भाद्रपद शुद्ध तृतीया!
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा देव गणेशा चे आमच्या घरी आगमन झाले.
पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती !
आपल्या सर्वांवर गणपतीबाप्पाची कृपादृष्टी सदैव असू देत.
'आपला देश आणि संपूर्ण जग लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊ देत'हीच 'श्री' च्या चरणी प्रार्थना!
आजच्या शुभमुहुर्तावर मी माझ्या ब्लॉग लेखनाला सुरूवात करीत आहे.
मी आमच्या घराच्या गणरायाचा फोटो येथे पोस्ट करीत आहे.
गणपतीबाप्पा मोरया!
डॉ जयश्री गढरी.मुंबई.
22 ऑगस्ट 2020

सूर्यस्तवन

रोज सकाळी सूर्योदय पाहणे हा कित्येक वर्षांपासूनचा  माझा छंद आहे.  या लेखात सूर्याची महती लिहीण्याचा मी प्रयत्न  केला आहे  आहे......