28 ऑगस्ट 2020
माझी प्रिय मैत्रीण 'जाई'
.सायंकाळी खुलली आहे आमच्या खिडकीत.शुभ्रधवल कळ्यांवर हलकीशी गुलाबी छटा!
मऊ मऊ मुलायम नाजुक रेशमाच्या पोताच्या पाकळ्या,आणि त्या परिचित स्वर्गीय सुगंधाची मुक्तहस्ते उधळण करणारी माझी जिवलग सखी जाई!
बालपणी अरूणोदयी खुडलेल्या पक्व कळ्यांनी आणि उमललेल्या फुलांनी काठोकाठ भरलेली ओंजळ!
प्रभाती खुडलेल्या कळ्या सायंकाळी ताटात पसरवल्या की ,त्या अर्धोन्मिलित, उमलणार्या कळ्यांच्या दैवी सुगंधाने अवघा आसमंत दरवळतो.
या चित्त प्रसन्न करणार्या सुगंधाच्या निर्मितीसाठी सहजच ईश्वराची कृतज्ञता व्यक्त होते.जगातील कोणताही परफ्युम हिच्या सुगंधापुढे निष्प्रभच!
श्रावणात जाईचा देवघरातील वावर,शुक्रवार,मंगळागौरी,कृष्णाष्टमी,सत्यनारायणाच्या पूजेत स्थान! जाईचे अनेक संदर्भ आणि संदर्भाचे मोहक गंध!
आयुष्याच्या निरनिराळ्या वळणावर प्रसन्न सुवासाने दुःखावर फुंकर घालणारी ,तर आनंदात भर घालणारी ,मन प्रफुल्लित करणारी माझी प्रियसखी जाई!
चमेलीचे संस्कृतमध्ये नाव चंबेली,इंग्रजीत जास्मीन, हिन्दीत चमेली,चंबाली आहे.
तर प्रियवंदा,सुरभीगंधा ही देखील जाईची नावे आहेत.
फोटोत जवळ मोगरा असल्यामुळे त्याची पानेही फोटोत आली आहेत.जाई आणि चमेली ही एकाच फुलाची नावे आहेत.
©️ डॉ. जयश्री गढरी.मुंबई
No comments:
Post a Comment